Lok Sabha Election 2024 ः शिर्डी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी आज संगमनेर तालुक्यातील पेमरेवाडी व सतीची वाडी या मतदार केंद्राना भेट दिली. या मतदार केंद्रातील मतदारांशी संपर्क साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पेमरेवाडीला जोडणाऱ्या रस्त्यांच्या सुरू असलेल्या कामाची अपर जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.
संगमनेर तालुक्यापासून 45 किलोमीटरवर असलेल्या भोजदरी गावाअंतर्गत पेमरेवाडी असून या वाडीत सुमारे तीनशे मतदार आहेत. पेमरेवाडी शिर्डी लोकसभा व अकोले विधानसभा मतदारसंघात येते. पेमरेवाडीतील नागरिकांनी रस्त्यांच्या मागणीसाठी 2019 च्या लोकसभा निवडणूकीत मतदानावर बहिष्कार टाकला होता. 2024च्या निवडणूकीपूर्वी या गावाला जोडणाऱ्या साडेतीन किलोमीटरच्या रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीत या वाडीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून यावर्षी लोकसभा निवडणूकीत मतदान करणार असल्याचे सांगितले आहे.
संगमनेर विधानसभा मतदार संघात असलेल्या सतीची वाडीचे (शिंडेवाडी) 497 मतदार आहेत. सतीची वाडीचे मतदार केंद्र संवेदनशील मतदान केंद्र म्हणून गणले जाते. निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी सतीची वाडीला भेट देत तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रशासनाला नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना दिल्या.
मतदान केंद्राना भेट दिल्यानंतर कोळेकर यांनी संगमनेर विधानसभा मतदार संघातील निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला. संगमनेरचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी व निवडणूक अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.