पाकिस्तान भयंकर आर्थिक संकटातून जात आहे. पाकिस्तानात महागाई शिगेला पोहोचली आहे. पाकिस्तानी लोकांना जीवनावश्यक वस्तूही मिळत नाहीत. एवढेच नाही तेथील किमती गगनाला भिडल्या आहेत. यातच पाकिस्तानच्या जवळचा त्याचा मित्र चीनने तांत्रिक कारण देत पाकिस्तानामधील आपला दूतावासाचा काॅन्सुलर विभाग तात्पुरता बंद केला आहे. चीनच्या या घाेषणेमुळे पाकिस्तानी नागरिकांनी व्हिसा मिळणे कठीण हाेणार आहे. यामुळे पाकिस्तान चांगलाच अडचणीत आला आहे. जिओ न्यूज नुसार, चीनच्या दूतावासाने हे पाऊल उचलण्यामागे कोणतेही विशेष कारण दिलेले नाही. वाणिज्य दूत विभाग कधी उघडला जाईल हे देखील चीनने सांगितले नाही. चीनी दूतावासाने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या नोटीसमध्ये वाणिज्य दूत विभाग बंद करण्यात येत असल्याची घोषणा केली. 13 फेब्रुवारीपासून सुरू झालेला हा विभाग पुढील आदेशापर्यंत बंद राहणार असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, सुरक्षेची परिस्थिती पाहता पाकिस्तानमध्ये राहताना अत्यंत सावध राहावे, असा इशाराही चीनने आपल्या नागरिकांना दिला आहे.