Ahmednagar News : “मराठी भाषा ही भारतातली एक प्रमुख भाषा आहे, संस्कृत भाषेतील ज्ञान जेव्हा सर्वसामान्य नागरिकांना समजत नव्हते तेव्हा, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम आदी संतांनी हे ज्ञान मराठी भाषेत महाराष्ट्रातील लोकांना उपलब्ध करून दिले. देशामध्ये अश्या काही मोजक्याच भाषा आहेत ज्यात असे काम झाले आहे आणि त्यापैकी मराठी एक महत्त्वाची आणि अतिशय समृद्ध अशी भाषा आहे. तुम्ही आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेताय त्यामुळे भविष्यात मोठी भरारी मारू शकाल तेव्हा इंग्रजी शाळेत शिकत नसल्याचा न्यूनगंड मनात कधी बाळगू नका….!!” असे नगर जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर वें यार्लगड्डा यांनी व्यक्त केले. राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी, तालुका राहुरी येथील विद्यार्थ्यांशी अनौपचारिक गप्पा मारताना बोलत होते.
मराठी भाषेचे महत्त्व सांगणाऱ्या एक छोट्या नाटुकलीच्या सुरूवातीची प्रस्तावना विद्यार्थ्यांनी न्यायाधीशांसमोर सादर केल्यावर त्याने प्रभावित झालेल्या साहेबांनी विद्यार्थ्यांना मातृभाषेतील शिक्षण, मराठी भाषेचे महत्त्व या विषयावर अतिशय सुंदर शब्दात मार्गदर्शन केले. न्यायालय, जिल्हा प्रमुख न्यायाधीश आणि त्यांची कामे याविषयी ही मुलांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. मराठी भाषेविषयीचे ज्ञान आणि संवाद साधण्याच्या कलेनंतर जेव्हा आपली मातृभाषा मराठी नसून तेलगू आहे, हे सांगितले तेव्हा सर्व विद्यार्थ्यांना खूप आश्चर्य वाटले. विद्यार्थ्यांनी यावेळी न्यायाधीशांना ‘भाषालूनि वेरैना भावं ओक्कटे….!’ हे तेलगू भाषेतील देशभक्तीपर गीत म्हणून दाखवले. त्या गीताचा अर्थ विद्यार्थ्यांना सांगत न्यायाधीशांनी त्यांच्या उज्वल भविष्यासाठी अनेक उत्तम आशीर्वाद दिले. शुभेच्छा देत सर्व विद्यार्थ्यांना खाऊ दिला व कोर्ट रूम प्रत्यक्ष पाहण्याची परवानगी देत, विद्यार्थ्यांना कोर्ट रूम, विटनेस बॉक्स, आरोपी बसवण्याची जागा हे सगळ पाहण्याची व्यवस्था करून दिली.
तत्पूर्वी शाळेतील विद्यार्थी न्यायालयाच्या परिसरात पाहून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी विद्यार्थ्यांची विचारपूस केली व न्यायाधीशांच्या भेटीचा योग जुळवून आणला. “शालेय विद्यार्थी व त्यातही सरकारी शाळेतील विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांच्या बाबतीत जिल्हा प्रमुख व सत्र न्यायाधीश यांचे खूप मोलाचे सहकार्य असते. मुलांशी संवाद साधायला जिल्हा व सत्र न्यायाधीश नेहमी उत्सुक असतात. या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी न्यायालयत एक तर साहेब म्हणून किंवा वकील म्हणून यायला हवे ….! ” असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटील म्हणाल्या. त्यांच्या पर्सनल कॉन्फरन्स रूममध्ये विद्यार्थ्यांना बसवून त्यांना खाऊ देणाऱ्या अश्या या विराळ्या जिल्हा प्रमुख व सत्र न्यायधीश आणि न्यायालय पाहून विद्यार्थी हरखून गेले.
“हा आमच्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण आहे. आमच्या सारख्या लहान मुलांना सहज समजेल अशा शब्दात न्यायाधीशांनी संवाद साधला. आम्हाला मराठी भाषेचे महत्त्व सांगितले. आम्हाला खूप आनंद आणि अभिमान वाटतोय…” असे शाळेच्या विद्यार्थिनी जान्हवी गायकवाड व विद्या जाधव म्हणाल्या. या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक संदीप शेळके यांनी विशेष सहकार्य केले तर केंद्रप्रमुख अशोक शेळके, शिक्षण विस्तार अधिकारी अर्जुन गरूडकर, गटशिक्षणाधिकारी मोहिनीराज तुंबारे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.