Chetan sharma :स्टिंग ऑपरेशनमध्ये अडकल्यानंतर माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्माने बीबीसीआय (BCCI) निवड समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या स्टिंग ऑपरेशनमध्ये शर्मा यांनी काही गोपनीय माहिती उघड केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका सूत्राने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले की, “होय, चेतनने बीसीसीआय सचिव जय शाह यांना राजीनामा पत्र सादर केले आहे आणि त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे.”
स्टिंग ऑपरेशननंतर त्यांची प्रकृती अस्थिर झाली होती. त्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला आहे. त्यांना राजीनामा देण्यास सांगितले नाही. बंगाल आणि सौराष्ट्र यांच्यातील रणजी ट्रॉफी फायनलसाठी चेतन शर्मा निवड समितीच्या इतर सदस्यांसह कोलकात्यात होते. इराणी चषकासाठी संघ निवडीसंदर्भात तो तेथे गेला होता.
चॅनलच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्माने म्हटले आहे की, अनेक खेळाडू 80 ते 85 टक्के तंदुरुस्त असूनही स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये लवकर परतण्यासाठी इंजेक्शन घेतात. भारताच्या माजी वेगवान गोलंदाजाने असाही आरोप केला की सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनावरून त्याच्या आणि संघ व्यवस्थापनामध्ये मतभेद होते.
