अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अहमदनगर कार्यालयातील गोदामाला आज सायंकाळी साडेसहा वाजता आग लागली. कार्यालयातील औषध विभागाचा मुद्देमाल ठेवलेल्या खोलीला ही आग लागली होती. अहमदनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाने पाणी शिंपडून ही आग विझवली. आग नेमकी कशाने लागले हे मात्र कळू शकले नाही. सायंकाळचा वेळ आटोपल्यानंतर अधिकारी कार्यालय बंद करून बाहेर पडले होते. हे अधिकारी कार्यालयापासून काही अंतरावर गेले असतानाच मागे कार्यालयाला आग लागली.
अहमदनगर कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे (अन्न), अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप कुटे, राजेश बडे, उमेश सूर्यवंशी, शरद पवार यांना आग लागल्याची माहिती समजतात कार्यालयाकडे धाव घेतली.
दरम्यान, या कार्यालयाच्या शेजारी राहणारे प्रकाश शेलार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कार्यालयाच्या खिडकीतून धूर येताना पाहिले. याचवेळी आगीच्या प्रेशरने खिडकीच्या काचा फुटल्या. त्यांना आगीचे लोळ बाहेर येताना दिसले. शेलार यांनी खिडकीच्या बाजूने शिडी लावून आगीवर पाणी शिंपडले. पण आगीचे लोळ उठत होते. तरी देखील त्यांनी पाणी शिंपडणे सुरूच ठेवले. त्यामुळे आग आटोक्यात राहिली. प्रकाश शेलार यांच्या ह्या धाडसाचे कौतुक अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी केले.
आगीमुळे कार्यालयातील गोदामातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. कार्यालयातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने नेमके किती नुकसान झाले हे कळू शकलेले नाही. उद्या सकाळी त्याची कार्यवाही होईल, असे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे (अन्न) यांनी सांगितले.