अहमदनगरच्या शेवगाव-पाथर्डीतील आमदार माेनिका राजळेंविरुद्ध कार्यकर्त्यांची नाराजीचा बांध प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमाेर फुटला. यावेळी कार्यकर्त्यांनी आमदार राजळेंविरुद्ध जाेरदार घाेषणाबाजी केली. याचबराेबर अहमदनगरची दक्षिण जिल्हा कार्यकारिणीचा वाद थेट प्रदेशाध्यक्षांसमाेर पाेहाेचला. यावर ताेडगा काढण्यासाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आमदार माेनिका राजळे आणि जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग या दाेघांना मुंबईत पाचारण हाेण्यास सांगितले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अहमदनगर दक्षिण लाेकसभा मतदारसंघात महाविजय 2024 अभियान अंतर्गत आयाेजित कार्यकर्ता कार्यशाळेनिमित्त अहमदनगर दौऱ्यावर हाेते. नगर तालुक्यातील शेंडी बाह्यवळण रस्त्यावर अहमदनगर दक्षिण कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात आमदार माेनिका राजळे यांच्याविराेधात प्रदेशाध्यक्षांसमाेर घाेषणाबाजी करण्यात आली. ‘राजळे हटाव’, ‘पंकजा मुंडे जिंदाबाद’, ‘गाेपीनाथ मुंडे अमर रहे’, अशा घाेषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. ही घाेषणाबाजीने काहीसा गाेंधळ निर्माण झाला हाेता.
गाेकुळ दाैंड, बाळासाहेब साेनवणे, अरण मुंडे, तुषार वैद्य, गणेश कराड, बाळासाहेब काेळगे, सजंय मरकड हे घाेषणाबाजीत पुढे हाेते. घाेषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांनी राजळेंविरुद्ध आक्रमक भूमिका मांडली. अहमदनगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी जिल्हा कार्यकारिणीत पाथर्डी-शेवगावमधील राजळे विराेधकांना स्थान दिले हाेते. त्यावरून आमदार राजळे यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याशी संपर्क करत त्याला स्थगिती मिळवली. त्यातून राजळे विराेधक आक्रमक झाले आहेत. याचे पडसाद प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दाैऱ्यात उमटले.