पर्यटन संचालनालयाच्या नाशिक उपसंचालक कार्यालयामार्फत 12 ते 16 ऑगस्टला अहमदनगर जिल्हयातील भंडारदरा येथे “वर्षा महोत्सव” चे आयोजन करण्यात आले आहे. 12 ते 15 ऑगस्ट हा लॉंग विकेंड व पावसाळयाचे दिवस लक्षात घेवून पर्यटकांचा वर्षा पर्यटनाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत या वर्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटक या महोत्सवात सहभागी होऊन आनंद घेत असल्याचे पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक मधुमती देसाई यांनी सांगितले.
12 ऑगस्टला भंडारदरा येथे आदिवासी नृत्य, लोककला यांचे सादरीकरण करण्यात आले. 13 ऑगस्टला घाटघर कोकणकडा इथं स्थानिक लोककलेचे कार्यक्रम, वारली चित्रकला स्पर्धा, अक्षर गणेश अॅक्टिविटी, स्थानिक लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आनंद सुमारे 400 ते 500 पर्यटकांनी सहभाग नोंदवला. राज्यातील व परराज्यातील व्यावसायिकांना भंडारदरा येथील पर्यटनाचा अनुभव देण्याच्या दृष्टीने 13 ऑगस्टला फॅमटूरचे आयोजन करण्यात आले होते.
फॅमटूरमध्ये महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली, छत्तीसगड व पं. बंगाल या राज्यातील पर्यटन व्यावसायिक सहभागी झाले होते. फॅमटूरने भंडारदरा येथील विविध पर्यटन स्थळांना भेटी देत न्हाणी, वसुंधरा व नेकलेस धबधबा यांचा आनंद घेतला. त्यानंतर अमृतेश्वर मंदिर, घाटघर धरण व भंडारदरा परिसरातील वर्षा पर्यटनाचा आनंद घेत निसर्गसौंदर्याची अनुभूती घेतली.
14 तारखेला सांधण दरी, साम्रद गांव परिसरात वर्षा महोत्सवनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वारली चित्रकला कार्यशाळा, अक्षर गणेश कार्यशाळा, झिपलाईन (साहसी पर्यटन अॅक्टिवीटी), आदिवासी लोककला व लोकनृत्य सांस्कृतिक कार्यक्रम, वर्षा झुंबा डान्स, कपल डान्स, कठपुतली आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 15 व 16 तारखेला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटकांनी वर्षा महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.