“स्पर्धांमध्ये जरी अपयश आले तरी आपल्याला काय जमते याकडे लक्ष द्या. स्वतःला अपडेट करून नवीन ज्ञान आत्मसात करा. खेळाडू वृत्तीने अपयश स्वीकारून खचून न जाता यशासाठी प्रयत्न करत रहा. स्पर्धेमधुनच आपण अनेक गोष्टी शिकतो. मनाने खंबीर राहून स्पर्धेत भाग घ्या तुम्हला यश नक्कीच मिळेल”, असा मोलाचा सल्ला प्रसिद्ध सिने व मालिका अभिनेत्री अनिता दाते यांनी मुलांना दिला.
अहमदनगरच्या बॅक स्टेज आर्टिस्ट्स असोसिएशनच्यावतीने घेण्यात आलेल्या सेठ शामसुंदर बिहाणी स्मृती कथाकथन स्पर्धा व मनीष कुलकर्णी स्मृती काव्यवाचन स्पर्धेचे परितोषिक वितरण प्रसिद्ध सिने व मालिका अभिनेत्री अनिता दाते यांच्या हस्ते रावसाहेब पटवर्धन स्मारक सभागृहात झाले. या कार्यक्रमात ज्येष्ठ रंगकर्मी पी.डी. कुलकर्णी व रेणुका भिसे यांना प्रा. मंगेश जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिला जाणाऱ्या पुरस्काराचे वितरणही अभिनेत्री दाते यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचे प्रायोजक प्रसिद्ध उद्योजक जितेंद्र बिहाणी, असोसिएशनचे अध्यक्ष प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे, संतोष बडे आदींसह दोन्ही स्पर्धांचे परिक्षक व्यासपीठावर उपस्थित होते. मनीष कुलकर्णी यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमास सुरवात झाली. यावेळी बॅक स्टेज आर्टिस्ट्स असोसिएशनचे सर्व सदस्य, नागरिक व स्पर्धक मोठ्या संख्यने उपस्थित होते. दोन्ही स्पर्धांना जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यातूनही उदंड प्रतिसाद मिळाला.
अभिनेत्री अनिता दाते म्हणाल्या, “लहानपणी भाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धांमध्ये अयशस्वी ठरलेली मी मुलगी होते. शाळेने व वडिलांनी कधीही मला प्रोत्साहन दिले नाही. स्पर्धामध्ये अपयशी ठरली तरी मी यशस्वी झाले”. चित्रपट क्षेत्राने खूप काही शिकवले असून खूप चांगली माणसे मला भेटली आहेत. हे क्षेत्र पूर्णपणे सुरक्षित असल्याने पालकांनी मुलामुलींना चित्रपट क्षेत्राकडे पाठवावे, असेही त्या म्हणाल्या.
जितेंद्र बिहाणी म्हणाले, “दरवर्षी बॅक स्टेज आर्टिस्ट्स असोसिएशनवतीने खूप चांगल्या स्पर्धांचे आयोजन होत आहे. बॅक स्टेज आर्टिस्ट्स असोसिएशनच्या सदस्यांकडून मैत्री कशी निभवावी, सातत्य कसं ठेवावे व उत्कृष्ट टीम वर्क हे तीन गुण घेण्यसारखे आहेत. उत्कृष्ट व नियोजनबद्ध स्पर्धा घेतल्याने त्या यशस्वी होत आहेत”.
अभिनेतe मिलिंद शिंदे यांनी बॅक स्टेज आर्टिस्ट्स असोसिएशनचे सर्व सदस्य आपापल्या क्षेत्रात पारंगत व व्यस्त आहेत. पण दरवर्षी सर्व सदस्य आपले सर्व कामे सोडून या दोन स्पर्धांचे नियोजन करत आहेत. या स्पर्धा म्हणजे कविता व कथेचा उत्सव आहे. ही स्पर्धा मनामनात पुस्तक पेरण्याची चळवळ आहे. स्पर्धांमध्ये यश मिळण्यासाठी रोज स्वतःला अपडेट करा, असे सांगितले. जितकं वाचाल तितके तुम्हाला कळेल की तुम्ही किती अज्ञानी आहात. ज्यांनी या स्पर्धेत बक्षिस पटकावले त्याचेच अभिनंदन. जे अपयशी ठरले त्यांनी आत्मपरीक्षण करावे. परिश्रमा शिवाय सहजासहजी यश मिळणार नाही, असेही ते म्हणाले.
संतोष बडे यांनी स्पर्धेच्या प्रतिसादाची माहिती प्रास्ताविकात दिली. अॅड.गौरव मिरीकर, कामोद खराडे, श्रीनाथ केसकर, अमित काळे आदींनी परिचय करून दिला. सिए ज्ञानेश कुलकर्णी यांनी पुरस्कार्थी पी.डी.कुलकर्णी व रेणुका भिसे यांचा परिचय दिला.
बॅक स्टेज आर्टिस्ट्स असोसिएशनचे विक्रांत मनवेलीकर, अमोल दाते, मंगेश देवचके, गजेंद्र क्षीरसागर, सागर जोशी, मनिष घोलप, राजस मिरीकर, प्राची कुलकर्णी, दादासाहेब बेरड, शिल्पा देशमुख, सत्तार शेख, योगेश कुलकर्णी, रविराज सातनूर, उपेंद्र कुलकर्णी, जयंत कोहोळे, विद्याधर ससे, गिरीष पोळ व डॉ. प्राजक्ता कुलकर्णी आदींनी स्पर्धा यशस्वीते साठी नियोजन केले. राधिका कुलकर्णी हिने सूत्रसंचालन केले. अभिजीत क्षीरसागर यांनी निकालाचे वाचन करून आभार मानले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे ः
कथाकथन स्पर्धा लहान गट प्रथम (विभागून) सान्वी देशपांडे औरंगाबाद व अद्विता कुलकर्णी औरंगाबाद, द्वितीय (विभागून) अर्णव पांडे व श्रीराम शिंदे, तृतीय (विभागून) राजश्री भणगे व अर्णव गावडे. कथाकथन मोठा गट प्रथम (विभागून) देवश्री कुसूरकर, पुणे व गौरवी हिरवे नगर, द्वितीय (विभागून) श्रावण शिंदे व प्रणाली थोरात, तृतीय (विभागून) श्रावणी शिंदे कालिका जावळे. तसेच भाऊसाहेब फिरोदिया हायस्कुलने स्पर्धेचा सांघिक करंडक पटकावला.
काव्यवाचन स्पर्धा प्रथम (विभागून) आरतजीवन प्रभूखोत व भावना बोरा, द्वितीय (विभागून)सुनील धस व माहीर कुलकर्णी, तृतीय प्रीती भोंबे. सर्व विजेत्यांना रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले.