Nagar MIDC Police ः नगर तालुक्यातील पोखर्डी येथे नशेसाठी वापरल्या जात असलेल्या गांजा झाडाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एमआयडीसी पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. कारवाईत ९२ हजार ५०० रुपये किमतीची ३७ किलोचा गांजाची झाडे जप्त करण्यात आल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिली.
पोखर्डी शिवारातील एका शेतात गांजाची झाडांची लागवड करण्यात आल्याची माहिती सहायक निरीक्षक माणिक चौधरी यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शोध पथकाकडून खात्री करून घेण्यात आली. माहितीत तथ्य आढळल्याने सहायक निरीक्षक चौधरी यांनी वरिष्ठ अधिकारी उपअधीक्षक संपतराव भोसले यांना कळविले. उपअधीक्षक भोसले यांनी कारवाईच्या सूचना दिल्यावर सहायक निरीक्षक चौधरी यांनी गुन्हे पथकासह पोखर्डी येथे गांजाची झाडे लावलेल्या शेतात घुसले. तिथे तपासणी केल्यावर मोठ्याप्रमाणात गांजाच्या झाडांची लागवड केल्याचे समोर आले. पोलिसांनी ही सर्व झाडे उपटून काढून ताब्यात घेतली.
शेतमालकाची चौकशी केल्यावर यादव नाना साबळे (रा. पोखर्डी, ता. नगर) असे त्यांचे नाव समोर आले. या गांजाच्या झाडांचा पंचनामा करून जप्त करण्यात आली. ९२ हजार ५०० रुपये किमतीची ३७ किलो वजनाची ही झाडे मिळून आली. उपनिरीक्षक मनोज मोंढे, पोलीस कर्मचारी नितीन उगलमुगले, नंदकिशोर सांगळे, राजू सुद्रिक, महमद शेख, महेश बोरुडे, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, जयसिंग शिंदे, उमेश शेरकर हे कारवाईत सहभागी झाले होते.