अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडली. संस्थेचे संस्थापक अशोकभाऊ फिरोदिया यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेला शालेय विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. या वर्षी देखील स्पर्धेत सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलने स्पर्धेचा सांघिक फिरता करंडक पटकाविला.
दरवर्षी घेतली जाणारी उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रमुख आकर्षण ठरली. स्पर्धकांना ऐन वेळेस विषय देऊन त्यावर विचार मांडण्यास सांगण्यात आले होते. अशोकभाऊ फिरोदिया शाळेच्या सभागृहात प्रारंभी स्पर्धेचे उद्घाटन अशोकभाऊ फिरोदिया व शांतीकुमारजी फिरोदिया यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून शोभना गायकवाड व राजेंद्र देवडे उपस्थित होते.
मनीष कांबळे यांनी स्पर्धेसाठी विविध विषयांचा समावेश असून, स्पर्धकाने स्वत: चिठ्ठी काढून त्या विषयावर बोलण्याचे स्पष्ट करुन स्पर्धेची माहिती दिली. रेणुका पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. रविंद्र उजागरे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. सल्लागार समितीचे सदस्य भूषण भंडारी यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. विविध विषयांवर रंगलेल्या वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मनमोकळे आपल्या भावना मांडल्या. स्पर्धा संपल्यावर निकाल जाहीर करुन बक्षिस वितरण करण्यात आले. बक्षिस वितरणावेळी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, विश्वस्त सुनंदा भालेराव, सल्लागार समिती सदस्य भूषण भंडारी, प्राचार्य प्रभाकर भाबड, उपप्राचार्या कविता सुरतवाला, विभाग प्रमुख वैशाली वाघ, रेखा शर्मा उपस्थित होते.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक- प्रणाली बाबासाहेब कडूस (श्रीराम कृष्ण इंग्लिश मीडियम स्कूल) द्वितीय क्रमांक- अलविना जायमोन (सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूल), तृतीय क्रमांक- श्रेयस शास्त्री (ऑक्झिलियम कॉन्व्हेंट हायस्कूल), उत्तेजनार्थ- ओजस कुलकर्णी (भाऊसाहेब फिरोदिया), अंकिता जवादे (साईनाथ माध्यमिक विद्यालय, शिर्डी) यांनी बक्षिसे पटकाविली. मनीष कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. विशाल गोहेर यांनी आभार मानले.