Nagar News :आपणास वाटते की बँक बंद करुन खूप मोठे काम केले, बँक वाचवली परंतु प्रत्यक्षात असे काहीही झालेले नसून आपल्या कृत्यानेच नगर अर्बन बँकेची बदनामी झाली आहे. त्यामुळे बँक बचाव संघर्ष समितीचे कार्य त्वरीत थांबवावे, असे आवाहन नगर अर्बन बँकेचे सभासद अन्वर खान यांनी केले आहे. तर खान यांना जशास तसे प्रत्युत्तर मिळाले आहे. सोशल मीडियावर बँकेच्या ठेवीदारांनी धारेवर धरले असून, खानसाहेब, बँकेत अडकलेले आमचे पैसे तुम्हीच आता परत करा, अशी मागणी केली आहे.
बँक बचाव संघर्ष समितीने ठेवीदार व सभासदांना एकजूट होण्याचे आवाहन केले व उदासीनता दाखविल्यास संघर्ष समिती यापुढे काम थांबविणार असल्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर, खान यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
बँक बचाव संघर्ष समितीच्या नावाखाली बँकेच्या सभासद, ठेवीदार, कर्जदार यांची कायम दिशाभूल करुन व खोटेनाटे कार्य करून स्वतः प्रसिध्दीत राहण्याच्या कार्याशिवाय कोणतेही ठोस कार्य करु न शकलेल्या बचाव संघर्ष समितीमुळे बँकेबाबत भीतीचे, घबराटीचे वातावरण तयार झाले आहे, असा दावा करून खान यांनी म्हटले आहे की, आपण सामंजस्याने एकत्र बसून व चर्चा करून मार्ग काढण्याची सुरुवातीपासूनच कोणतीही ठोस भूमिका न घेता, उलट बँक वाचविण्यापेक्षा बँक कशी बंद होईल व इतर पतसंस्था, बँका कशा वाढतील असेच प्रयत्न केले.
बँक बचाव संघर्ष समितीने उठसूट नगर अर्बन बँकेवर कायम खापर फोडल्यामुळेच व जीवाचा आटापिटा करुन बँक परवाना रद्द होण्यासाठी प्रयत्न केले. वास्तविक बँकेची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे. बँकेकडे स्वतःची स्थावर, जंगम मालमत्ता असून सभासदांच्या ठेवी सुरक्षित आहेत. शंभरी पार केलेल्या नगर अर्बन बँकेवर सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतकांचा दृढ विश्वास असून बँकेची सर्व ठेवीदारांची संपूर्ण रक्कम देण्याएवढी ऐपत असताना अजूनही ठेवीदारांची संपूर्ण रक्कम मिळणार नाही, उशिराने मिळेल वगैरे खोटीनाटी दिशाभूल करुन सभासदांना एकत्र करण्याचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे, असा आरोपही खान यांनी बँक बचाव समितीवर केला आहे. यामुळे कर्जदार, ठेवीदार यांची मानसिकता खराब झाली असून कर्जदार अतिशय तणावात आहे. कर्ज रक्कम कोठून उभी करावी हा गंभीर प्रश्न कर्जदारांना भेडसावत आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.
खानसाहेब, तुम्हीच आमचे पैसे द्या
नगर अर्बन बँक बचाव कृती समितीने कामकाज थांबवण्याचे आवाहन करणारे बँकेचे सभासद अन्वर खान यांना सोशल मिडियावर बँकेच्या ठेवीदारांनी धारेवर धरले असून, खानसाहेब, बँकेत अडकलेले आमचे पैसे तुम्हीच आता परत करा, अशी मागणी केली आहे.
हाजी अन्वर खान यांचे नगर अर्बन बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी मृत दिलीप गांधी कुटुंबीय यांच्याशी स्नेहाचे संबंध आहेत. अन्वर खान गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या अल्पसंख्याक कमिटीचे काम पाहतात. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अन्वर खान यांचे असे पत्र म्हणजे केवळ बँकेच्या गैरव्यवहारातील आरोपींना क्लीनचीट देण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप ठेवीदारांनी करताना, आमची ठेवींची संपूर्ण रक्कम तुम्हीच व्याजासहित देऊन टाका. आमची त्यानंतर कुणाशी कुठलीही तक्रार नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे आता यावर अन्वर खान काय भूमिका मांडतात, हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर अर्बन बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेच्या भीतीने शहरातून गायब झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, भाजपशी संबंधित असलेल्या व्यक्तींकडून नगर अर्बन बँक सुस्थितीत असल्याचा दावा केल्याच्या पोस्ट सोशल मीडियात व्हायरल केल्या जात असून भाजपच्या अल्पसंख्याक कमिटीत कार्यरत असलेले अन्वर खान यांचे एक पत्र सध्या सोशल मीडियात आहे. मात्र, त्यांच्या या पत्रावर नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी संताप व्यक्त केला आहे.
खान यांच्या पत्रामध्ये नगर अर्बन बँकेची परिस्थिती चांगली असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, इतकीच बँकेची परिस्थिती चांगली आहे तर आधी आमच्या ठेवी परत करा, असे खुले आव्हान त्यांना दिले आहे. दरम्यान, न्यायालयात प्रकरण सुरू असून न्यायालयाचा निर्णय येण्याआधीच आरोप-प्रत्यारोप रंगत आहेत. बँकेवर अवसायक गणेश गायकवाड यांची नियुक्ती असून गायकवाड यांच्या भूमिकेविषयी देखील ठेवीदारांनी यापूर्वी नाराजी व्यक्त केलेली आहे. आरोपी आणि कर्जदार यांच्या अटकेसाठी न्यायालयाने अनेकदा निर्देश दिल्यावरच पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. मात्र खान यांच्या या पत्राचा रोख हा आरोपींना क्लीनचीट देण्याचा प्रयत्न असल्याचा दावा ठेवीदारांकडून करण्यात आला आहे.