Ahmednagar Crime Newsः व्याजाने घेतलेल्या 60 हजार रूपयांच्या बदल्यात एक लाख 50 हजार रूपयांपेक्षा जास्त रक्कम घेतली. यानंतर देखील दमबाजी करून घर नावावर करून घेतले. नगरमधील अवैध सावकारीचा हा प्रकार समोर आला आहे. महिलेविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शांता बाळासाहेब वाघ (रा. लांडेगल्ली, नालेगाव, नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या सावकाराचे नाव आहे. उपनिबंधक सहकारी संस्था नगर तालुक्याचे सहकार अधिकारी (श्रेणी 2) शेख अलताफ अब्दुलकादर (वय 42, रा. आलमगीर, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे. शंतनु सतीष दळवी (रा. बागडे मळा, बालिकाश्रम रस्ता) यांनी उपनिबंधक सहकारी संस्था नगर तालुका यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला.
या अर्जानुसार ‘शांता बाळासाहेब वाघ हिच्याकडून 60 हजार रूपये घेतले होते. त्याचे व्याज व मुद्दलाचे एक लाख 50 हजार रूपयांपेक्षा जास्त रक्कम दिली होती. तरी देखील शांता वाघ हिने दळवी यांच्या घरी गुंड लोक पाठवून दमबाजी करून राहते घर तिने तिच्या नावावर करून घेतले. तसेच अजून रक्कमेची मागणी करून जिवे मारण्याची धमकी देत आहे’.
दरम्यान, उपनिबंधक कार्यालयात यावर सुनावणी झाली. तसेच उपनिबंधक कार्यालयातील पथकाने शांता वाघ हिच्या घराची झडती घेऊन मिळालेल्या कागदपत्रांची शहानिशा केली असता या व्यवहार हा सावकारकीच्या पैशातून झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शांता वाघविरूध्द महाराष्ट्र सावकारी अधिनियम (नियमन) 2014 चे कलम 39 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे तपास करीत आहत.