केंद्रीय आणि एकात्मिक जीएसटी (GST) विधेयकांमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. या विधेयकांना संसदेने मुंजरी देखील दिली आहे. या विधेयकांच्या दुरुस्तीनंतर ऑनलाईन गेमिंग, कॅसिनाे आणि अश्व शर्यतींच्या क्लबमधील बेटच्या संपूर्ण दर्शनी मूल्यावर 28 टक्के कर लावण्याची दुरुस्ती विधेयकात करण्यात आली आहे.
राज्यसभेने दाेन प्रस्तावित विधेयके चर्चेविना आवाजी मतदानाने लाेकसभेकडे परत पाठवली. लाेकसभेने तत्पूर्वी केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (दुरुस्ती) विधेयक, 2023 आणि एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (दुरुस्ती) विधेयक, 2023 ही दाेन वित्त विधेयके मंजूर केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन्ही विधेयके दाेन्ही सभागृहांत मांडली. यानुसार आता राज्यातील जीएसटी कायद्यात या दुरुस्त्या संबंधित विधानसभांमध्ये मंजूर कराव्या लागणार आहेत.
या दुरुस्तीनुसार जीएसटी कायदा, 2017 मध्ये शेड्यूल तीनचा समावेश करण्यात येणार आहे. यात कॅसिनाे, अश्व शर्यत आणि ऑनलाइन गेमिंगवरील कर आकारणीबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. एकात्मिक जीएसटी कायद्यातील दुरुस्तीअंतर्गत परदेशी संस्थांकडून ऑनलाइन मनी गेमिंग पुरवण्याबाबतची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. या दोन्ही कायद्यांतील दुरुस्त्यांना जीएसटी कौन्सिलने गेल्या आठवड्यात मंजुरी दिली होती.