कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे बुऱ्हाणनगर (ता.नगर) येथील पुरातन मंदिरात रविवारी सकाळी महापूजा, अभिषेक करून दुपारी १२ वाजता आईराजा उदोउदो…, सदानंदीचा उदो उदो…, तुळजाभवानी माताकी जय अशा जयघोषात विविधीत घटस्थापना झाली. यावेळी मंदिराचे पुजारी भगत कुटुंबियांच्या सुवासिनींनी डोक्यावर घट घेवून मंदिर परिसराला वाजतगाजत प्रदक्षिणा मारली. या शोभायात्रा नंतर मंदिराचे मुख्य पुजारी अॅड.विजय भगत व अॅड.अभिषेक भगत यांनी मंदिरात विधिवत घटस्थापना करून देवीची महाआरती केली. नवरात्रोत्सवानिमित्त तुळजाभवानी देवीची मूर्ती सुवर्ण अलंकारांनी मढण्यात आली आहे. देवीच्या दर्शनास भाविकांनी सकाळपासूनच मोठी गर्दी केली आहे.
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी देवीच्या मंदिराची रंगरंगोटी करून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर परिसरातही सजावट करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिना असल्याने भाविकांचा उन्हापासून बचाव व्हावा यासाठी मंदिर परिसरात मंडप टाकण्यात आले आहेत. या वर्षांपासून देवीच्या मुखदर्शनाचीही सोय करण्यात आली असून भाविकांना मंदिरातूनच देवीचे मुखदर्शन करता येणार आहे. यासाठी वेगळी रांग असणार आहे. केवळ गाभाऱ्याची स्वच्छता व मंदिराच्या साफसफाईसाठी मंदिर काहीवेळ बंद असणार असून भाविकांना २१ तास देवीचे दर्शन करता येणार आहे. नवरात्रोत्सवानिमित्त पुढील १० दिवस भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मंदिराचे पुजारी अॅड.अभिषेक भगत यांनी देवून सर्व भाविकांनी सर्व धार्मिक कार्याक्रमांचा व देवीच्या दर्शनचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
दुर्गा भगत, राजेंद्र भगत, अंजली भगत, किरण भगत, मनीषा भगत, सुभाष भगत, सुनंदा भगत, कविता भगत, ऋषिकेश भगत, अॅड.अजिंक्य भगत, वैभवी भगत, कुणाल भगत, अंकिता भगत, अॅड.संकेत भगत, अक्षता भगत व वेद भगत, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, छाया फिरोदिया व अशा फिरोदिया उपस्थित होते.