अहमदनगर : ब्रिटिश कालीन पोलीस सब इन्स्पेक्टर अण्णासाहेब श्रीधर क्षीरसागर यांना बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी सन्मानपूर्व प्रदान केलेली तलवार क्षीरसागर कुटुंबीयांनी अहमदनगर ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय व संशोधन केंद्राकडे सुपूर्द केली.
ऐतिहासिक ठेवा असलेल्या तलवारीचे योग्यप्रकारे जतन होण्याच्या उद्देशाने व हा इतिहास नागरिकांपर्यंत जाण्याच्या हेतूने क्षीरसागर परिवाराने वस्तुसंग्रहालयाचे विश्वस्त डॉ. रवींद्र साताळकर व अभिरक्षक डॉ. संतोष यादव यांच्याकडे अण्णासाहेब क्षीरसागर यांची तलवार व त्यांची प्रतिमा भेट दिली. यावेळी सुधाकर क्षीरसागर, मनोहर क्षीरसागर, मालिनी गाडेकर, रोहिणी क्षीरसागर, पुष्पा क्षीरसागर आदींसह बेलापूर बदगी (ता. अकोला) येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
बडोदा (गुजरात) संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी सन 1936-37 मध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर स्व. अण्णासाहेब श्रीधर क्षीरसागर यांनी रेल्वे पोलीस मध्ये उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल त्यांचा ब्रिटिश कालीन तलवार देऊन सन्मान केला होता. या तलवारीच्या मुठ जवळ चांदीचे छोटे नाणे आहे. तर पूर्वी त्या तलवारीच्या टोकाला दक्षिण आफ्रिकेच्या जंगलातील विष लावलेले होते. या तलवारीने झालेली जखम कोणत्याही औषध व मलमने भरुन निघत नव्हती. ही तलवार सहाणवर घासून त्याचा मलम बनविल्यास त्या तलवारीने झालेली जखम भरुन निघते असे हे या तलवारीचे वैशिष्टये होते, अशी माहिती सुधाकर क्षीरसागर यांनी दिली.
डॉ. रवींद्र साताळकर म्हणाले, “नागरिकांकडे आपल्या कुटुंबातील ऐतिहासिक दुर्मिळ वस्तुंचा ठेवा असल्यास ते ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाला दिल्यास त्याचे योग्य प्रकारे जतन होणार आहे. तर त्या गोष्टीशी जुडलेला इतिहास देखील भावी पिढी पर्यंत जाऊ शकणार आहे”. यासाठी नागरिकांनी आपल्याकडील ऐतिहासिक दुर्मिळ वस्तुंचा ठेवा वस्तुसंग्रहालयास देण्याचे त्यांनी आवाहन केले.