अहमदनगर : जिल्ह्याचे नामांतर होऊन त्याचे नवीन नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव ठेवण्याची तोंडी घोषणा चौंडी येथील कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. परंतु अहमदनगरचे नाव अहिल्यानगर की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हाच प्रश्न अजून सरकारला सुटलेला नाही. अहिल्यादेवी यांची जन्मभूमी अहमदनगर जिल्ह्यातील चाैंडी असली तरी कर्मभूमी मात्र मध्यप्रदेशमधील इंदौर ही आहे. त्यामुळे त्यांची कर्मभूमी इंदौर या जिल्ह्याचे नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर करावे, ही मागणी मध्यप्रदेश काँग्रेस पक्षाच्या प्रभारी या नात्याने मध्यप्रदेश सरकारकडे गेल्या तीन महिन्यांपूर्वीच केली आहे. पण आता मध्यप्रदेश राज्याच्या निवडणुका लागल्या तरी त्या नावाची दखल तेथील भाजप सरकारने घेतली नाही. याची खंत आहे, अशी प्रतिक्रिया काॅंग्रेसच्या महिला राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ यांनी दिली.
अहिल्यादेवी होळकर यांनी महिला असूनही त्या काळात देशभर आपल्या कामाचा व कर्तृत्वाचा ठसा उमटविला. त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व असल्याने त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. परंतु महाराष्ट्रात केवळ आता लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांच्या नावाचा वापर करून इथले तीन पक्ष्याचे सरकार अहमदनगर दक्षिणचे नामांतर करेल व ओबीसी मतांचं ध्रुवीकरण होईल अशी अपेक्षा बाळगून आहेत. परंतु अहमदनगर या नावला ऐतिहासिक वारसा आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी याच अहमदनगरमधील भुईकोट किल्यात “डिस्कव्हरी ऑफ इंडिया” हा ग्रंथ लिहिला आहे. तसेच सावित्रीबाई फुले यांनी सुध्दा अहमदनगरच्या क्लेराब्रुस शाळेत शिक्षण घेतले होते. त्यानंतरच त्यांनी देशभर शाळा काढून मुलींना शिक्षण देऊन सक्षम बनविल्याचे भुजबळ यांनी म्हटले.
अहमदनगरमधील अहमद हे नाव मुस्लिम आहे. मुस्लीम समाज नेहमीच कॉंग्रेसच्या सोबत असतो. त्यामुळेच केवळ निवडणुकीतील मतांसाठी जिल्ह्याच नाव बदलणे कितपत योग्य आहे. केवळ नाव बदलून जिल्ह्याचा विकास होत नसतो तर त्यासाठी भरीव निधी आणून विकास करावा लागतो. परंतु विकास कामे न झाल्याने त्यावरून दुर्लक्ष करण्यासाठीच अहमदनगरचे नाव बदलून जनतेची विकासापासून दिशाभूल करण्याचे काम काही, भाजप नेते करत आहेत. सरकारचे लक्ष द्यायचे असेल, तर सरकारी शाळेचे खासगीकरण व सरकारी आरोग्य केंद्रांचे खासगीकरण न करण्याकडे आणि ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लक्ष द्यावे, अशाही राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ यांनी म्हटले आहे.