अहमदनगर ः 1894 साली पुणे येथे स्थापन झालेल्या महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा साहित्य व संशोधन पुरस्कार नगर मधील ज्येष्ठ साहित्यिक डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या ‘लोककला : संकल्पना व स्वरुप’ या ग्रंथास नुकताच जाहीर झाला. हा ग्रंथ पुणे येथील पद्मगंधा प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.
रविवार दि.29 ऑक्टोबर 2023 रोजी सायं.6 वा. डॉ.प्र.ल.गावडे सभागृह, भावे स्कूल, पुणे येथे संस्थेचा 129 वा वर्धापन दिन आणि वार्षिक ग्रंथ पारितोषिक वितरण समारंभात हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. इस्कॉनचे उपाध्यक्ष संभाजीराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे, ग्रंथोत्तेजक संस्थेच्यावतीने गेली 125 वर्षे अशा प्रकारे पुरस्कार देण्याची परंपरा आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ.गो.बं.देगकुरकर यांनी दिली.
‘लोककला’ या ग्रंथात लोककलांची परंपरा, स्वरु व संकल्पना मांडतांनाच लोककलेची व्याख्या ठरविण्याचे अवघड काम या ग्रंथात केले आहे. प्राचिन परंपरा, लोकजीवन आणि लोककला यांच्या परस्पर संबंधावर प्रकाश टाकण्यासाठी सैद्धांतिक दृष्टीकोन लाभतो. आज उत्कांत होत असलेली लोकसंस्कृती जाणून घेणे या ग्रंथामुळे शक्य झाले आहे. लोककला क्षेत्रासाठी ‘लोककल : संकल्पना आणि स्वरुप’ हा अभिनव ग्रंथ आहे.
डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे हे लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक आहेत. चाळीसगाव डागाण परिसर सांस्कृतिक, वाङमयीन आणि भाषिक अभ्यास हा प्रबंध, लोकबंध, लोकसाहित्य संशोधन पद्धती, लोकबंधात्मक चिकित्सा, लोकसाहित्याच्या अभ्यासातील चकवे आणि उतारे, लोकसाहित्य परिषद, लोसाहित्य संशोधन मंडळ, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र साहित्य परिषद आदि अनेक संस्थांकडून डॉ.सहस्त्रबुद्धे यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या ‘लोककला : संकल्पना आणि स्वरुप’ या ग्रंथास पुण्याच्या महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे साहित्य क्षेत्रासह विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.