अहमदनगर : स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी निघालेल्या कन्याकुमारी ते दिल्ली या पदयात्रेचे सोमवार 6 नोव्हेंबरला अहमदनगर येथे आगमन झाले. त्यावेळी नवजीवन संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांनी या यात्रेचे स्वागत केले.
यावेळी नवजीवनचे राजेंद्र पवार, कॉ. बहिरनाथ वाकळे, प्रा. पॉल भिंगारदिवे, संपतराव रोहोकले, अमोल खंडागळे, उदय पवार, तुषार सोनवणे, अशोक घोरपडे, सलीम शेख, ऋषिकेश राऊत, विशाल कदम यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
कर्नाटक राज्यातील दावणगेरे येथील सामाजिक कार्यकर्ते चन्नेश एम. जाकाली यांनी कन्याकुमारी ते दिल्ली अशी पदयात्रा काढून स्त्री भ्रूणहत्या आणि बालहक्कांचे संरक्षण यासाठी जनजागृती करत आहे. त्यांच्या कल्पनेनुसार, गर्भवती महिलेला एक डिजिटल कोड दिला पाहिजे, जो बाळाच्या जन्मापर्यंत त्यांच्या गर्भधारणेवर लक्ष ठेवण्यास मदत करतो. त्यांनी 24 सप्टेंबरला कन्याकुमारी येथून पदयात्रा सुरू केली पदयात्रेचा अहमदनगर जिल्ह्यात आजचा 46 वा दिवस होता. आणि 5 जानेवारी 2024 दिल्लीला पोहोचणार आहे.
चन्नेश म्हणाले, “2014 मध्ये स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी त्यांनी सविस्तर अहवाल राज्य सरकारला सादर केला होता. राज्य सरकारने तो केंद्र सरकारकडे अंमलबजावणीसाठी पाठवावा. मात्र ९ वर्षे उलटून गेल्यानंतरही याबाबत कोणतेही पाऊल उचलले गेले नाही”. या संदर्भात समाजात महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना घडत आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी त्यांनी पदयात्रा काढली आहे, असे ते म्हणाले.
या योजनेंतर्गत, एकदा महिला गरोदर असल्याची पुष्टी झाल्यानंतर एक विशेष ओळख क्रमांक आणि आधार कार्ड दिले पाहिजे. गरोदरपणाचे तपशील डिजिटल स्वरूपात नोंदवले जातील. याद्वारे, ओळख क्रमांक, गर्भवती महिलेची आरोग्य स्थिती, देशाच्या कोणत्याही भागातून स्कॅनिंगचा तपशील कळू शकतो असे ते म्हणाले.