अहमदनगर ः नगर अर्बन बँकेमध्ये झालेल्या विविध अफरातफरी बोगस कर्ज प्रकरणासंबंधी कार्यक्षेत्रात दाखल झालेल्या गुन्ह्यांमधील आरोपींना तातडीने अटक करून त्यांची मालमत्ता जप्त करावी. ठेवीदारांचे पैसे परत मिळण्याच्या मागणीसाठी ठेवीदारांचा पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
यावेळी बँकेचे जागरूक सभासद राजेंद्र चोपडा, राजेंद्र गांधी, मनोज गुंदेचा, संजय झिंजे, भैरवनाथ वाकळे, संध्या मेढे, अँड.अच्युतराव पिंगळे, एस.झेड. देशमुख, सदा देवगावकर, महेश देवरे, दिनकर देशमुख, दिलीप घुले, राजेंद्र कर्डिले आदीसह ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
निवेदनात म्हटले आहे की, 113 वर्षाचे जुने वैभवशाली बँकेचा परवाना रिझर्व बँकेने 4 ऑक्टोंबर 2023 रोजी रद्द केला आहे. त्यामुळे तेथील ठेवीदार सभासद व कर्मचारी यांचे भवितव्य अंधकारमय झालेले आहे. वास्तविक पाहता नगर अर्बन बँकेतील चेअरमन संचालक मंडळ वरिष्ठ अधिकारी हे विविध घोटाळे व अफरातफरी करत असलेचे आपल्या निदर्शनास 17 फेब्रुवारी 2019 रोजी साडेचार वर्षांपूर्वी निदर्शनास आणून दिले होते.
परंतु दुर्दैवाने पोलिसांनी त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे व्यथित होऊन बँकेचे सभासदांना उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे याचिका दाखल करावी लागली व खंडपीठाची नोटीस प्राप्त झाल्यानंतर कोतोली पोलीस स्टेशनला आदेश देऊन 17 फेब्रुवारी 2022 रोजी गुन्हा नोंदवून घेतला. या दाखल गुन्ह्यातील सर्व कलमे अ जामीन पात्र होती. परंतु खात्याकडून कोणत्याही संचालकाला ताब्यात घेतले गेले नाही. ते संचालक पुन्हा पुन्हा भ्रष्ट कामे करतच राहिली व याची परिणीती म्हणून 4 ऑक्टोबर 2023 रोजी बँक बंद झाली.
बँक बंद झाल्यामुळे गोरगरीब ठेवीदारांचे जवळपास 320 कोटी रुपये अडकले आहे. सभासदांचे भाग भांडवल व लाभांशाचे नुकसान झाले आहे. वार्षिक 2000 कोटीचा व्यवसाय बंद झाल्यामुळे सभासदांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. कोतवाली पोलीस स्टेशन येथे चिल्लर घोटाळा गुन्हा दाखल, डमी जामीनदार घोटाळा गुन्हा दाखल, तोफखाना पोलीस स्टेशन येथे बनावट मूल्यांकन घोटाळा गुन्हा दाखल, शेवगाव पोलीस स्टेशन येथे बनावट सोनेतारण घोटाळा गुन्हा दाखल, राहता पोलीस स्टेशनला बँकेतर्फे तक्रार अर्ज, श्रीगोंदा पोलीस स्टेशनला बँकेतर्फे तक्रार तसेच महाराष्ट्र ठेव संरक्षण कायद्याअंतर्गत अनेक अर्ज असे अनेक गंभीर गुन्ह्याचे पोलीस दप्तरी नोंद असून देखील त्यावर कुठलेही ठोस कारवाई न झाल्यामुळे आज बँक बंद पडली आहे.
तरी संबंधित सर्व दाखल गुन्हे व तक्रार अर्जाचा विचार करता बँकेचे चेअरमन संचालक मंडळ यांना तातडीने अटक करून त्यांची मालमत्ता जप्त करण्यात यावी अन्यथा येत्या पंधरा दिवसात ठोस व योग्य कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.