अहमदनगर : राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांसाठी आरोग्य मंत्री यांनी जाहीर केलेली वेतनवाढ आणि दिवाळी बोनसच्या निर्णयाचे आयटकच्या वतीने शहरात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी स्वागत केले. या निर्णयाने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून, सर्वांचे या शासन निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
बुरुडगाव रोड येथील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची बैठक पार पडली. यावेळी आरोग्य मंत्री यांनी जाहीर केलेल्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आयटकचे राष्ट्रीय सदस्य ॲड. कॉ. सुधीर टोकेकर, स्वाती भणगे, तब्बसुम तांबोळी, सुरेखा भुजबळ, स्वाती कापरे, संगीता उल्हारे, सीता शेळके, निर्मला राठोड, कल्पना जोशी, दुर्गा चंद्रे, माया ताठे, सोनू दिंडे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत 70 हजारांपेक्षा अधिक आशा स्वयंसेविका व 3 हजार 500 पेक्षा अधिक गटप्रवर्तक कार्यरत आहे. बळजबरीने करुन घेतले जाणारे ऑनलाईनचे काम बंद होण्यासाठी व वेतनवाढसह विविध प्रलंबीत मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता. संपाच्या 13 व्या दिवशी शासनाने संपाची दखल घेऊन आशा स्वयंसेविकांना 7 हजार रुपये मानधन वाढ, गटप्रवर्तकांना 6 हजार 200 रुपये मानधन वाढ देण्यासह आशा व गटप्रवर्तकांना प्रत्येकी दोन हजार रुपये दिवाळी बोनस देण्याची घोषणा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी बुधवारी (दि.1 ऑक्टोबरला) आरोग्य भवन येथे झालेल्या बैठकीत जाहीर केले. या निर्णयाचे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी स्वागत केले असून, याबाबत तातडीने शासन निर्णय काढण्याची मागणी करण्यात आली आहे. तर पुकारलेला संप शासन निर्णय निर्गमीत झाल्यानंतर स्थगित होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
शासनाकडून चांगली दिवाळी भेट मिळाल्याची अशा सेविका व गटप्रवर्तकांनी समाधान व्यक्त केला. मात्र गटप्रवर्तकांच्या मागणीसाठी पुन्हा मुंबई येथे 400 गट प्रवर्तक उपोषण व निदर्शने केले. तेव्हा त्यांना बैठकीमध्ये 10 हजार रुपये व समावेशन बाबत प्रस्ताव केंद्र सरकार कडे पाठवू म्हणून सांगितले आहे. परंतु शासन निर्णय निघेपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचे सुवर्णा थोरात यांनी सांगितले.
कॉ. ॲड. सुधीर टोकेकर म्हणाले की, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना जाहिर केलेली वेतनवाढ स्वागतार्ह आहे. आशा सेविकांनी राज्यात एकजुटीने केलेल्या संपामुळे सरकारला दखल घ्यावी लागली. आशा व गटप्रवर्तकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, मात्र आशांकडून बळजबरीने ऑनलाइनचे कामे करून घेऊ नये. आशा सेविका सर्व ऑफलाइनचे कामे करण्यास तयार आहेत. सरकारला पूर्णतः सहकार्य करण्याची आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची भूमिका असल्याचे स्पष्ट करुन, त्यांनी या निर्णयाबद्दल सरकारचे आभार मानले.