अहमदनगर : “जीवनात खेळाडू म्हणून यशस्वी व्हायचे असेल तर तीन गोष्टी महत्वाच्या असतात. कठोर परिश्रमाची तयारी, खेळावर नितांत प्रेम आणि आपल्या देशाविषयीचा अभिमान, या तीन गोष्टी कोणत्याही खेळाडूला यशाच्या शिखरावर पोहोचवते”, असे प्रतिपादन स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केले.
भिंगार अर्बन बँक, माळीवाडा या शाखेत शाखाधिकारी म्हणून कार्यरत असणारे संतोष मिसाळ यांचा मुलगा ओम याने जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक व नुकत्याच डेरवण येथे झालेल्या 14 वयोगटात राज्यस्तरीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत गोळाफेकमध्ये द्वितीय क्रमांक पटकाविला. त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्यानिमित्त स्नेहबंधच्यावतीने सन्मानपत्र, पदक व वृक्ष देऊन अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी सत्कार केला. त्याप्रसंगी विद्या मिसाळ, अनुजा मिसाळ आदी उपस्थित होते.
ओम हा भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल येथील विद्यार्थी असून जोधपूर (राजस्थान) येथे 17 ते 19 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पश्चिम विभागीय ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये स्पर्धेमधे खेळणार आहे. ओम हा भिंगार स्पोर्ट्स क्लबचा खेळाडू असून त्याला प्रशिक्षक विठ्ठल काळे व शंकर औरंगे यांचे मार्गदर्शन लाभले.