अहमदनगर ः वन्यजीव संरक्षण व संवर्धनासाठी गेल्या 25 वर्षापासून अहमदनगर मध्ये कार्यरत असलेले अहमदनगरचे निसर्ग मित्र मंदार साबळे यांची महाराष्ट्र शासन वनविभागाच्या जिल्हा मानद वन्यजीव रक्षक या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्र शासना च्या महसूल व वन विभागाने नुकतीच तशी अधिसूचना पारित केली आहे.
साबळे हे वन विभागाच्या जिल्हा व्याघ्र संरक्षण समिती तसेच रेस्क्यू टीमचे सदस्य म्हणून देखील कार्यरत असून त्यांनी यापुर्वी वनविभागाचे अधिकृत सर्प मित्र म्हणून देखील काम केले आहे.तसेच ते सध्या महापालिकेचे पर्यावरण दूत म्हणून ही कार्यरत असून वृक्ष प्राधिकरण समिती च्या सदस्य पदावर त्यांनी बारा वर्ष काम पाहिले आहे.
वन्यजीव संवर्धनाबरोबरच वृक्ष संवर्धन क्षेत्रातही त्यांचे योगदान आहे. त्यांनी नेचर लव्हर्स क्लब या संस्थेच्या माध्यमातून नगर शहर, तालुका तसेच जिल्ह्याच्या विविध भागात फिरून आत्तापर्यंत संकटात सापडलेल्या हजारो साप व इतर वन्य प्राणी पक्षांना वाचवले आहेत. त्यांचे जिल्ह्यातील सापांची माहिती असलेले ‘सर्प परिचय’ हे पुस्तकही प्रकाशित झालेले आहे.नायलॉन मांजा वापरू नये म्हणूनही ते गेली अनेक वर्षे ते जनजागृती करत आहेत.
या नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून जिल्हा उपवनसंरक्षक डॉ. सुवर्णा माने, भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ़ डिफेन्स मधील आयडीएएस अधिकारी अॅडिशनल सीडीए डॉ. महेश दळे (नाशिक), वेतन लेखा कार्यालय एमआयआर मधील वरीष्ठ लेखा अधिकारी पीएसए मूर्ती, वेतन लेखा कार्यालयातील हिंदी अधिकारी गोविंद कनोजिया, निवृत्त सहायक वनसंरक्षक अनिल तोरडमल,निवृत्त वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील थेटे, भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, माजी स्थायी समिती सभापती नरेंद्र कुलकर्णी,नेचर लव्हर्स क्लब चे सचिव नितीन थोरात तसेच अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
वन्यजीव संवर्धन व संरक्षणाचे कार्य खूप व्यापक असून ही नवी मिळालेली जबाबदारी सर्वार्थाने सार्थ ठरवू , असे साबळे यांनी सांगितले आहे.