Lok Sabha Election2024 : अहमदनगर-शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी 100 टक्के मतदानाची भूमिका बजवावी. त्याचबरोबर मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी व मतदारांमध्ये जनजागृती होण्यासाठी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या संकल्पनेतून “मै तेरा-13मे” या रिल्स बनविणे स्पर्धेचे अहमदनगर जिल्हा स्वीप समितीच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे. बनविण्यात आलेल्या रिल्स, व्हिडिओ 9002109003 या व्हाट्सअप क्रमांकावर 10मे 2024 पर्यंत पाठविण्याचे आवाहनही स्वीप समितीच्यावतीने करण्यात आले आहे. मी माझ्या लोकशाहीचा पाईक असून 13 मे रोजी मतदान करून लोकशाहीतील या महत्त्वपूर्ण दिवसाचा सन्मान करील, या भावनेने या स्पर्धेचे नाव “मै तेरा- 13मे…” असे ठेवण्यात आले असून विजेत्या स्पर्धकांना भरघोस पारितोषिके प्रदान केली जाणार आहे.
स्पर्धेसाठी उत्सव निवडणुकीचा-अभिमान देशाचा, माझं मत- माझा अधिकार, आपले अहमदनगर/शिर्डीचे मतदान 13 मे रोजी आहे, जरूर मतदान करा. हे तीन विषय असून तीस सेकंद ते एका मिनिटाच्या रिल्स बनवणे आवश्यक आहे. रिल्समध्ये कोणत्याही राजकीय व्यक्तीचे नाव, उमेदवाराचे नाव, राजकीय पक्षाचे नाव, निवडणूक चिन्ह असू नये. तसेच रिल्स बनवताना आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे. रिल्स सोबत स्वतःचे संपूर्ण नाव पूर्ण पत्त्यासह सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी देशातील पहिल्या अहमदनगर स्वीप केअर असलेल्या 9002109003 या व्हाट्सअप क्रमांकावर 10 मे 2024 पर्यंत पाठवावेत.
SVEEP- ” स्वीप ” या शब्दाचा अर्थ Systematic Voter’s Education and Electoral Participation म्हणजेच निवडणूक-मतदान प्रक्रियेत मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग असा अर्थ होतो. जास्तीत जास्त रिल्सप्रेमी व सजग मतदारांनी मतदार जनजागृती विषयक रिल्स पाठवावेत, असे आवाहन उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, अशोक कडूस (स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी), मीना शिवगुंडे (स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी), आकाश दरेकर (स्वीप नोडल अधिकारी तथा उपशिक्षणाधिकारी), प्रदीप पाटील(तहसीलदार-निवडणूक), बाळासाहेब बुगे (उपशिक्षणाधिकारी), प्रशांत गोसावी (निवडणूक नायब तहसीलदार), डॉ.अमोल बागुल (जिल्हा मतदारदूत)व सर्व स्वीप समिती सदस्यांनी केले आहे.