Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हा शाखेने अहमदनगर शहरामध्ये छापा घालून 73 लाख 24 हजार 500 रुपयांची रक्कम जप्त केली होती. यापैकी 69 लाख 44 हजार 500 रुपये एवढ्या रक्कमेचे योग्य स्पष्टीकरण न मिळाल्याने ही रक्कम आयकर विभागाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आली. उर्वरित तीन लाख 80 हजार रुपयांची रक्कम योग्य स्पष्टीकरण मिळाल्याने बोल्हेगाव येथील कृष्णा विजय भगत यांना सुपूर्द करण्यात आली. मुख्य लेखा वित्त अधिकारी तथा खर्च सनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी यांनी ही माहिती दिली.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अहमदनगर शहरामध्ये 21 मार्चला छापा घालून ही रक्कम जप्त करण्यात आली होती. नगर जिल्हा तक्रार निवारण समितीने आयकर विभागाला चौकशी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आयकर विभागाने दिलेल्या अहवालानुसार ही कार्यवाही करण्यात आल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.