अहमदनगर ः काँग्रेस पक्षाचे जुने निष्ठावान नेते तथा स्वकुल साळी समाजाचे ज्येष्ठ नेते दत्तात्रय मारुती राव कांबळे उर्फ डी. एम.कांबळे यांचे सोमवारी सकाळी ११:३० च्या सुमारास खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुली, जावई, व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
२१ ऑगस्ट १९४६ साली नगर मधील एका स्वकुळ साळी समाजातील गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. हलाखीच्या कौटुंबिक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी त्यांच्या आई विड्या वळविण्याचे काम करायच्या. डी. एम. कांबळे यांनी बी. कॉम. ची पदवी घेतल्या नंतर अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत त्यांनी नोकरी केली. त्याच काळात ते काँग्रेस पक्षातही सक्रिय होते. १९७९ साली त्यांनी बँकेतील नोकरीचा राजीनामा दिला. अखिल भारतीय मजदुर काँग्रेसचे ते सरचिटणीस, महाराष्ट्र हौसिंग फायनान्स चे चेअरमन, सिद्धिविनायक हौसिंग सोसायटीचे चे चेअरमन, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा अहमदनगर चे अध्यक्ष अशा अनेक पदांवर त्यांनी काम केले.
साहित्यिक, सामाजिक, व राजकीय क्षेत्रात ते सक्रिय होते. त्यांनी नेवासा ते आळंदी डोक्यावर ज्ञानेश्वरी घेऊन दौरा केला होता. आळंदी येथील साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष कवयत्री शांता शेळके, स्वागताध्यक्ष विश्वनाथ कराड, उद्घाटक लता मंगेशकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला होता. त्यानंतर पुढील संमेलन अहमदनगर येथेच व्हावे असा आग्रह त्यांनी धरला आणि त्यामुळेच अहमदनगर येथील ८३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. या संमेलनाच्या आयोजनात त्यांचा सिंहाचा वाटा होता. या संमेलनानंतर अहमदनगर जिल्ह्यातील कवींच्या कवितांचा समावेश असलेले ५०० पानांचा काव्य नगरी हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह हा त्यांनी स्वखर्चाने प्रकाशित केला. व सर्व कवींना तो काव्यसंग्रह सन्मानाने मोफत वितरित केला.
डी. एम. कांबळे हे राजकारणात सक्रिय असले तरीही हौसिंग फायनान्सच्या अध्यक्षपदा व्यतिरिक्त दुसरी कुठलीही निवडणूक त्यांनी लढवली नाही तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या तिकिटासाठी ते सतत आग्रही असत. स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. अण्णासाहेब शिंदे, स्व. मारुतीराव घुले पाटील, स्व. शंकरराव काळे, स्व. विलासरावजी देशमुख, स्व. शंकरराव चव्हाण अशा दिग्गज नेत्यांसोबत त्यांचे निकटचे संबंध होते. या सर्व नेत्यांचा सहवास त्यांना लाभला. त्याचा उपयोग त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी वेळोवेळी केला. जिल्ह्यातील अनेक योजना मार्गी लावण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मुळा, वृद्धेश्वर व कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीतही त्यांचा मोठा वाटा होता. मा. खा. यशवंतराव गडाख, मा. आ. आप्पासाहेब राजळे, बन्सीभाऊ मस्के, बाबासाहेब पवार, कुंडलिकराव जगताप यांच्याशी त्याची घनिष्ठ मैत्री होती.
साहित्यिक व कलावंतांवर त्यांचे विलक्षण प्रेम होते. सुरेश भट, रणजित देसाई, भिमराव पांचाळे अशा अनेक साहित्यिकांच्या गप्पांच्या मैफली त्यांच्या निवासस्थानी रंगत असत. यशवंतराव चव्हाण यांच्या कृष्णकाठ या आत्मचरित्रात देखील डी. एम..कांबळे यांचा उल्लेख आढळतो. त्यांनी नगर – मनमाड रोडवर उभारलेल्या हॉटेल कॉटेज कॉर्नर च्या उद्घाटनासाठी सिनेअभिनेते शशी कपूर नगरला आले होते.
जिल्ह्यातील लेखक, कवी व साहित्यिकांना त्यांचा आधार वाटत होता. शब्दगंधच्या चौथ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. अहमदनगर येथील अमरधाम स्मशानभूमी मध्ये सोमवारी सायंकाळी ७ वा त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. यावेळी साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनिल गोसावी, खजिनदार भगवान राऊत, राज्य संघटक कवयत्री शर्मिला गोसावी, तसेच मसाप अहमदनगर शाखेच्या वतीने अध्यक्ष किशोर मरकड, चंद्रकांत पालवे, प्रा. मेधाताई काळे, दशरथ खोसे, डॉ. संजय कळमकर, डॉ. च. वी. जोशी, यांच्यासह अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.