सामाजिक कार्यकर्ते, लेखक हेरंब कुलकर्णी यांच्यावर अहमदनगरमध्ये अज्ञात तीन व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला आहे. हेरंब कुलकर्णी यांच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी हेरंब कुलकर्णी यांची प्रकृती स्थिर आहे. हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला झाल्याने अहमदनगरमधील सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. हल्लेखाेरांच्या शाेधासाठी पाेलिस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन देण्याची तयारी संघटनांनी चालवली आहे. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहे. सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध करत हल्लेखाेरांना तातडीने अटक करा, अशी मागणी केली आहे. याचबराेबर राजकीय नेत्यांनी गृहविभाग आणि पाेलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. काॅंग्रेस नेते आमदार बाळासाहेब थाेरात यांनी समाज माध्यमांवर पाेस्ट शेअर करत हल्ल्याचा निषेध करत अहमदनगर शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारीवर चिंता व्यक्त केली आहे. खासदार सुप्रिया सुळे अहमदनगर दाैऱ्यावर असल्याने त्यांनी हेरंब कुलकर्णी यांची घरी जाऊन भेट घेतली आहे. याचबराेबर खासदार ओमल काेल्हे, आमदार राेहित पवार, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह प्रमुख नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध करत सरकारवर टीका केली आहे. तसेच आमदार संग्राम जगताप आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांनी रात्री उशिरा हेरंब कुलकर्णी यांची भेट घेतली.
हेरंब कुलकर्णी हे अहमदनगरमधील सीताराम सारडा विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. हेरंब कुलकर्णी आणि त्यांचे सहकारी शिक्षक सुनील कुलकर्णी हे शनिवारी दुपारी वाहनावरून घरी येत हाेते. त्यावेळी अहमदनगर शहरातील रासनेनगर परिसरात दुचाकीवरून आलेल्या तीन व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. हेरंब कुलकर्णी यांचे वाहन अडवले. त्यानंतर हल्लेखाेरांनी लाेखंडी राॅडने हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला चढवला. यात हेरंब कुलकर्णी यांच्या डाेक्याला जबर मार लागला आहे. त्यांचे सहकारी शिक्षक सुनील कुलकर्णी हे हल्लेखाेरांना राेखण्याच्या प्रयत्नात हाेते. त्यावेळी हल्लेखाेरांनी त्यांनाही बेदम मारहाण केली आहे.
मारहाण केल्यानंतर हल्लेखाेर दुचाकीवरून पसार झाले. हेरंबर कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ताेफखाना पाेलिसांनी गुन्ह्याची नाेंद घेतली आहे. हेरंब कुलकर्णी हे सामाजिक, शैक्षणिक विषयावर नेहमीच ठाेस भूमिका घेतात. प्राथमिक शिक्षणावर त्यांनी आदिवासी भागात केलेल्या कामाची दखल राज्य सरकारने घेतली आहे. तसेच अकाेले येथे दारुबंदीवर चळवळ उभारली हाेती. सीताराम सारडा विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून रुजू झाल्यावर त्यांनी शाळा परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी भूमिका घेतली आहे. या हल्ल्यामागे तेच कारण, तर नाही ना, याचा शाेध ताेफखाना पाेलिस घेत आहेत.
बाळासाहेब थाेरात यांनी आपल्या पाेस्टमध्ये म्हटले आहे की, “सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर अहमदनगर शहरात झालेला हल्ला निंदनीय आहे. दाेन दिवस उलटूनही पाेलिस हल्लेखाेरांना शाेधू शकलेले नाहीत. अहमदनगर शहरातील गुन्हेगारी संदर्भाने मी सातत्याने भूमिका मांडताे आहे. पाेलिस प्रशासनाला याबाबतीत गांभीर्याने धाेरण ठरवावे लागेल. हे कायद्याचे राज्य आहे. हे दाखवून देण्याची वेळ आली आहे”. अहमदनगर शहरातील वाढत्या गुन्हेगारीविषयी बाळासाहेब थाेरात यांनी पावसाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष्य केले हाेते. त्यावेळी सरकारची चांगलीच काेंडी झाली हाेती. या हल्ल्यानंतर बाळासाहेब थाेरात यांनी पुन्हा एकदा अहमदनगरमधील वाढत्या गुन्हेगारीविषयी चिंता व्यक्त केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी हेरंब कुलकर्णी यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. घडलेला घटनाक्रम सुळेंनी त्यांच्याकडून जाणून घेतला. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे, राेहिणी खडसे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित हाेते. भाजपच्या शासन काळात राज्यातील सामान्य माणूस असुरक्षित आहे. महाराष्ट्र गुंडांसाठी जणू नंदनवन ठरत आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात सपेशल अपयशी ठरल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली. सीसीटीव्हीत हल्लेखाेर दिसत असताना देखील त्यांच्यावर काेणतीही कारवाई झालेली नाही. हल्लेखाेर तातडीने गजाआड करण्याची मागणी करत हल्ल्याचा सुप्रिया सुळे यांनी तीव्र निषेध केला आहे.
खासदार अमाेल काेल्हे यांनी भाजपच्या शासनकाळा महाराष्ट्राचा यूपी बिहार हाेताेय का? ‘राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किती गंभीर झाला आहे, हे पुन्हा
एकदा या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. ‘देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात गृहखात्याचा काहीएक वचक गुन्हेगारांवर राहिला नाही’, असेही प्रतिक्रिया खासदार काेल्हे यांनी समाज माध्यमांवर पाेस्ट केली आहे. आमदार राेहित पवार यांनी देखील घटनेचा निषेध केला आहे. ‘या हल्ल्यानंतर सरकार आणि विशेषतः गृहखात्याची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. या घटनेची निष्पक्ष चाैकशी झाली पाहिजे’, अशी मागणी राेहित पवार यांनी केली आहे. “सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ला हाेऊन दाेन दिवस उलटले, तरी अहमदनगर पाेलिसांकडून काेणतीही कारवाई झालेली नाही. आराेपी माेकाट आहेत. तुम्ही हल्ले करू शकता त्यांचे विचार संपवू शकत नाहीत”, अशी प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.