भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले आणि त्यांचे चिंरजीव अक्षय कर्डिले यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अहमदनगर जिल्हा न्यायालयाने कर्डिले पिता-पुत्रांविरुद्ध गुन्हा नाेंदवण्याचा आदेश केला आहे. बुऱ्हाणनगर (ता. नगर) इथले वकील अभिषेक भगत यांनी कर्डिले पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करावा यासाठी न्यायालयात फाैजदारी प्रक्रिया संहितेतील कलम 156 (3) नुसार खासगी तक्रारी अर्ज दाखल केला हाेता. या तक्रारी अर्जाची न्यायालयाने दखल घेत कर्डिले पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश केला आहे. अहमदनगर जिल्हा न्यायालयातील अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकारी माया देशमुख यांनी हा आदेश केलाय, अशी माहिती तक्रारदार वकील अभिषेक भगत यांनी दिली.
वकील अभिषेक भगत यांनी न्यायालयात दाखल केलेल्या खासगी तक्रारीत म्हटले आहे की, श्री अंबिका तुळजाभवानी देवी मंदिराचे वंशपरंपरागत पुजारी असून बुऱ्हाणनगर (ता. नगर) इथं मिळकत जमिनी आहेत. देवीचे मंदिर, मालमत्ता बळकविण्याच्या हेतूनं शिवाजी कर्डिले हे अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या कारणाने त्रास देत आहेत. शिवाजी कर्डिलेंविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. शिवाजी कर्डिले आणि त्यांचा मुलगा अक्षय हा बुऱ्हाणनगर गावाशेजारी असलेली वारूळवाडी (ता. नगर) राेडलगत असलेली आमच्या कुटुंबाची मालमत्ता फुकट गिळंकृत करण्यासाठी त्रास देत आहेत. ही मालमत्ता देण्यास नकार दिल्याने शिवाजी कर्डिले यांच्याकडून अधिकच त्रास सुरू झाला. या गुंडगिरी विरोधात आवाज उठवल्याने कर्डिले यांनी 22 सप्टेंबर 2022 मध्ये त्याच्या घरी वारुळवाडी राेडवरील बुऱ्हाणनगर (ता. नगर) इथं शंभर-दीडशे अज्ञात व्यक्तींना बाेलावून घेतले. त्यावेळी 26 सप्टेंबर 2022 ला देवी मंदिरात नवरात्री उत्सवात घातपात करण्याचा कट रचला. तसेच कर्डिलेंनी या व्यक्तींसमाेर भडकाऊ भाषण केले. तसेच गंभीर गुन्ह्यात अडकविण्याचा कट रचला. याची माहिती मिळाल्याने 23 सप्टेंबर 2022 ला भिंगार कॅम्प पाेलिस ठाण्यात तक्रार दिली. परंतु तिथे तक्रार घेतली नाही. यानतंर पाेलिस अधीक्षकांकडे तक्रार दिली. यावर कारवाई झाली नसल्याचे वकील अभिषेक भगत यांनी न्यायालयाकडे दाखल तक्रारीत म्हटले आहे.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे 23 सप्टेंबर 2022 आष्टी (जि. बीड) इथं अहमदनगर-आष्टी-परळी रेल्वे मार्गाचा लाेकापर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहणार हाेते. तिथं दाेन्ही मंत्र्यांना भेटून शिवाजी कर्डिले यांच्या गुन्हेगारीविषयी तक्रार देण्यासाठी सुवेंद्र गांधी यांच्यासाेबत अभिषेक गेले हाेते. त्यावेळी पालकमंत्री विखे पाटील हे एका हाॅटेलमध्ये थांबले हाेते. त्यांना सुवेंद्र गंधी भेटण्यासाठी गेले. अभिषेक भगत हे तिथेच बाहेर थांबले. त्यावेळी शिवाजी कर्डिले हे तिथं आले आणि अभिषेक यांना शिवीगाळ केली. ‘जीवे मारण्याची धमकी देत, बाईच्या गुन्ह्यात अडकविताे. तुझा गाेविंद माेकाटे करताे, अशी धमकी दिली’, असे अभिषेक भगत यांनी तक्रारीत म्हटले आहे.
सुवेंद्र गांधी यांना देखील शिवाजी कर्डिले यांनी फाेन करून धमकी दिली. यावेळी फिर्यादी अभिषेक हे सुवेंद्र गांधींबराेबर हाेते. धमकीचे संभाषण समाज माध्यमांवर देखील व्हायरल झाले आहे. अभिषेक यांच्या तक्रारीवर सुवेंद्र गांधी यांचा भिंगार कॅम्प पाेलिसांनी जबाब नाेंदवला आहे. याचबराेबर सुवेंद्र गांधी यांना शिवीगाळ आणि दमदाटी केली आहे. सुवेंद्र गांधी यांनी पाेलिस अधीक्षकांकडे याबाबत तक्रार केली आहे. पंतप्रधान आणि शासकीय कार्यालयांकडे शिवाजी कर्डिलेंविरुद्ध तक्रारी असून देखील कारवाई झालेली नाही. शिवाजी कर्डिले यांच्यापासून संरक्षण मिळावे, यासाठी पाेलिस अधीक्षक कार्यालयाकडे पाठपुरावा करून देखील ते मिळालेले नाही, असेही अभिषेक भगत यांनी तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान 24 फेब्रुवारी 2023 ला शिवाजी कर्डिले यांचा पुत्र अक्षय याच्या सांगण्यावरून एका अज्ञान व्यक्तीने अभिषेक आणि माझ्या कुटंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली. काेतवाली पाेलिसांकडे याबाबत तक्रार दिली. त्यावेळी सांगितल्याप्रमाणे पाेलिसांनी तक्रार न घेता अज्ञात व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नाेंद घेतली. कर्डिले पिता-पुत्र आणि तिसरी अज्ञात व्यक्ती ही संगनमत करून मला खाेट्या गंभीर गुन्ह्यात अडकवून आमची मिळकत जमी फुटक गिळंकृत करण्याचे कटकारस्थान करत आहेत, असेही अभिषेक भगत यांनी अहमदनगर न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या सर्व तक्रारीची न्यायालयाने गंभीर दखल घेत पाेलिसांना गुन्हा दाखल करण्याचा आदेश केल्याची माहिती तक्रारदार वकील अभिषेक भगत यांनी दिली.