अहमदनगर ः मोहटा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या महिला भाविकाला येथील पूजेचे साहित्य विकणाऱ्या दुकानदाराने मारहाण व विनयभंग करून जबरदस्तीने पैसे घेतल्याची घटना रविवारी घडली. अहमदनगर येथील महिलेने पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मोहटा देवी गडावर महिलेला दुकानदाराकडून मिळालेल्या वागणुकीमुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी पूजेचे साहित्य विकणाऱ्या दुकानदारांकडून भाविकांना उद्धटपणाची वागणूक, तर मारहाणीचे प्रकार घडत असलेल्या घटनांना उजाळा दिला जात आहे. मजुरी करणाऱ्यांवर कायद्याचा धाक बसावा, अशी मागणी भाविकांकडून होऊ लागली आहे.
पोलिसात महिला भाविकांनी दिलेल्या फिर्यादी दिली आहे. नातवंडासह रिक्षाने अहमदनगर येथून मोहटा देवीगड येथे देवी मूर्तीच्या दर्शनसाठी रविवारी (ता.5) आलो होतो. त्यावेळी मोहटादेवी येथील देविका नारळ पेढा सेंटर दुकानासमोरून जातांना दुकानातील दोन अनोळखी महिला व एक पुरुष हे धावत रिक्षा समोर आले. रिक्षाला अडवे झाले. रिक्षा थांबवली. आमच्याकडे पुजेचे साहित्य घ्या,अशी जबरदस्ती केली. त्यावर महिला भाविक म्हणाल्या की आम्हाला पुजेचे सामान नको. त्यांच्यातील अनोळखी पुरुष दुकानदाराने महिलेच्या अंगावरील साडी पकडून रिक्षातून खाली ओढले. चापटाने मारहाण केली. यातून शरीराशी लगड केली. तुम्ही प्रसाद घेतला नाही तरी चालेल पण पैसे द्यावेच लागती, असे म्हटले.
यानंतर भाविक महिलेकडून दुकानदाराने बळजबरीने 200 रुपये काढून घेतले. त्यावेळी रिक्षातील महिलांना पूजेचे साहित्य विकणारे पुरुष व महिलांनी अश्लील शिवीगाळ केली. जीवे मारुन टाकू, अशी धमकी दिली. मारहाण करणारे अनोळखी इसमाचे दुकानचा बोर्ड पाहिला असता, त्यावर देविका नारळ पेढा सेंटर व प्रोप्रा. अंबादास दहिफळे, असे नाव दिसून आले, असे फिर्यादीत महिला भाविकांने म्हटले आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रामेश्वर कायंदे हे तपास करीत आहे.