Maratha Reservation News ः मराठा आरक्षणाचा लढा तीव्र होत असतानाच संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांच्या कोंडीचे प्रयत्न सुरू आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनोज जरांगे यांनी लक्ष्य केले आहे. मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांना स्थानबद्ध करण्याची कारवाई सुरू असतानाच कोपरगावमध्ये रस्ता रोको आंदोलन करणाऱ्या ४८ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी राज्यभरात गावागावांत रास्ता रोको करण्याची हाक दिली होती. त्यानुसार नगर शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. कोपरगाव शहर आणि तालुक्यातील धामोरी बसस्थानक, असे वेगवेगळ्या ठिकाणी सकल मराठा समाजतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी आता कोपरगाव पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
कोपरगाव शहरात केलेल्या आंदोलनप्रकरणी पोलीस कर्मचारी श्रीकांत कुर्हाडे यांनी, तर धामोरी येथील आंदोलनप्रकरणी युवराज खुळे यांनी फिर्याद दिली आहे. जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या जमावबंदीचे उल्लंघन करणे, आंदोलनाची परवानगी न घेणे यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नगर-मनमाड रस्त्यावर आंदोलन केल्यामुळे दोन्ही बाजूने लांबच लांबा रांगा लागून वाहतूक कोंडी झाली होती.
पोलीस कर्मचारी कुर्हाडे यांच्या फिर्यादीनुसार अनिल गायकवाड, विजय भगत, बाळासाहेब जाधव, विकास आढाव, बाळासाहेब देवकर, सुनील साळुंके, संदीप डुंबरे यांच्यासह सात जणांविरोधात, तर खुळे यांच्या फिर्यादीनुसार नारायण भाकरे, ज्ञानदेव मांजरे, सुनील गाजरे, नारायण मांजरे, सचिन कु्र्हाडे, शिवाजी वाघ, सुनील वाणी, अशोक भाकरे, प्रकाश वाघ यांच्यासह २५ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.