Mahatma Phule Agricultural University News ः राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील आंबा विक्री ई-टेंडर पद्धतीने करण्यात आली. यामध्ये यंदा विद्यापीठास रुपये एक कोटी 63 लाखांहून अधिकचा महसूल प्राप्त झाल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी सांगितले.
डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंबा उत्पादनात वाढ व विक्री पद्धतीमध्ये केलेल्या बदलांमुळे अधिकचा महसूल प्राप्त झालेला आहे. आंबा उत्पादन वाढीसाठी प्रक्षेत्रावरील अधिकारी व कर्मचारी यांनी आंबा बागांचे खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन तसेच किडींचे केलेले योग्य व्यवस्थापन अशा प्रकारची विशेष काळजी घेण्यात आली. यापूर्वी सन -2022 मध्ये रुपये एक कोटी 25 लाखांचा महसूल आंबा विक्रीतून विद्यापीठाला मिळाला होता.
यावर्षी मध्यवर्ती रोपवाटिका विभाग तसेच ‘अ’ व ‘ब’ विभागातील प्रक्षेत्रावर नव्याने 3700 आंबा फळ रोपांची लागवड केलेली आहे. भविष्यात कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंबा लागवडी खालील नवीन क्षेत्रात वाढ करण्यात येणार आहे. जेणेकरून विद्यापीठास कायमस्वरूपी महसूल प्राप्त होणार आहे. यासाठी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, कुलसचिव अरुण आनंदकर, नियंत्रक सदाशिव पाटील, बियाणे विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद सोळंके तसेच उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. बी. टी. पाटील यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे.