Ahmednagar News ः अहमदनगर शहरातील बहुचर्चित उड्डाणपुलाखाली सोमवारी रात्री गंभीर दुर्घटना घडली. सुदैवाने यात कोणाला दुखापत अथवा जीवित हानी झाली नाही. मात्र अचानक उड्डाणपुलाच्या पिलरचा काहीसा भाग कोसळल्यामुळे खालून जाणाऱ्या चार चाकी वाहनाची काच फुटून मोठे नुकसान झाले.
उड्डाणपुलाचा काही भाग कोसळल्याची माहिती कळताच अहमदनगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहोचले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुर्घटनाग्रस्त गाडी चालकाला मदत केली. उड्डाणपुलाचे श्रेय घेणाऱ्या खासदार, आमदारांनी या निकृष्ट कामाचे देखील आता श्रेय घ्यावे, अशी घणाघाती टीका यावेळी फेसबुक लाईक करत शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे. काळे यांच्या समवेत काँग्रेसचे पदाधिकारी चंद्रकांत उजागरे, विलास उबाळे, अनिस चुडीवाला, अभिनय गायकवाड इंजि. सुजित क्षेत्रे, बाबासाहेब वैरागर आदी उपस्थित होते.
उड्डाणपुलाचा मालबा अचानक कोसळला. त्यावेळी एक दुचाकी स्वार मागून येत होता. त्याने गाडी डावीकडे घातली. तो देखील अपघात होता होता बचावला. त्या ठिकाणी जवळच असणारे अहमदनगर शहर अल्पसंख्याक काँग्रेसचे पदाधिकारी चंद्रकांत उजागरे हे तात्काळ त्यांच्या मदतीला धावून गेले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. थोड्याच वेळात त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे विखे समर्थक देखील दाखल झाले. काळे यांनी आरोप केला आहे की त्या ठिकाणी विखे यांच्या कार्यकर्त्याने संबंधित गाडी चालकाला तिथून बळजबरीने गाडी काढण्यासाठी भाग पाडले. गाडीची चावी घेतली आणि स्वतः गाडी चालवत तिथून गाडी काढून घेतली. यावेळी काँग्रेसचे उजागरे यांनी त्यावर आक्षेप घेतला. मात्र भाजप कार्यकर्त्यांनी तिथून पटकन पोबारा केला.
किरण काळे म्हणाले, “ही घटना अत्यंत गंभीर आहे. सुदैवाने अपघातग्रस्ताचे प्राण वाचले आहेत. एखादा दूध चाकी स्वार त्या ठिकाणी असता तर त्याचा जीव त्या ठिकाणी गेला असता. उड्डाणपुलाच्या गुणवत्तेची चौकशी झाली पाहिजे. काँग्रेसचे शिष्टमंडळ बुधवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार करणार आहे”. या भ्रष्टाचारामध्ये आणि निकृष्ट कामामध्ये कुणी कुणी टक्केवारी खाल्ली त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल करण्याची मागणी काँग्रेस करणार असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.