Pune Climate Change Conference ः “हवामान बदलासाठी कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टीमध्ये मानवी हस्तक्षेप हा महत्वाचा घटक आहे. ग्रीन हाऊस गॅसेसमधून तापमान वाढत आहे. तसेच कार्बन डायऑक्साइड पीपीएम पातळीमध्ये खूप वाढ झाली आहे. त्यामुळे मानवी शरीरावर व जैवविविधतेवर परिणाम झाला आहे. निसर्गचक्रात बदल होऊन अवर्षणग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतीमधील किड रोग साखळीवर परिणाम होत असून पूर्वीच्या कमी नुकसानकारक किडी ह्या आता अधिक नुकसानदायक झाल्या आहेत. तापमान वाढीचा मोठा परिणाम मधुमक्षिकांवर होत असून त्याचा दूरगामी परिणाम कृषि उत्पन्न व पर्यायाने मानवी जीवनावर होणार आहे. येणाऱ्या गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करत येऊ घातलेली भितीदायक परिस्थिती नियोजनबद्ध पद्धतीने हाताळली गेली पाहिजे”, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
हा धोका लक्षात घ्या
तापमान 50 डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेले की वनस्पतींच्या फिजिओलॉजी मध्ये मोठा बदल होईल आणि त्याचे परिणाम यावर अभ्यास करणे आत्तापासूनच गरजेचे असल्याचे त्यांनी विशद केले. पावसाची अनियमितता, असमान वितरण, तापमानामध्ये होणारे बदल इत्यादीमुळे बदलत जाणारी पिकांची परिस्थिती, अशा विविध कारणांनी उत्पादनात 19 टक्के घट होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. या सर्वांचा सर्वात जास्त परिणाम कमी आर्थिक उत्पन्न वर्गावर होणार आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
एक दिवशीय “हवामान बदल परिषद”चे पुणे येथील कृषि महाविद्यालयाच्या डॉ. शिरनामे सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन राहुरी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर जेष्ठ हवामानतज्ञ डॉ. रंजन केळकर, ‘सकाळ समूहा’चे अध्यक्ष डॉ. प्रतापराव पवार व संपादक आदिनाथ चव्हाण उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील म्हणाले, “महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या बाबतीत खूप अगोदरच प्रयत्न सुरू केले आहेत. अवर्षणग्रस्त वातावरणात टिकून राहतील, अशा विविध पिकांच्या जवळपास सहाशे जाती व त्या अनुषंगाने तंत्रज्ञान विकसित केले आहे”. देशी गाई संशोधन प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सुरू केला आहे. त्यामध्ये तापमान नियंत्रित करण्यासाठी प्रणाली विकसित केली आहे. या संदर्भात विद्यापीठाने विविध नामवंत संस्थासोबत सामंजस्य करार केलेले आहेत,असेही त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ हवामानतज्ञ डॉ. रंजन केळकर यांनी शास्त्रज्ञांनी शेतक-यांशी संवाद साधला पाहिजे. शेती व अध्यात्माची सांगड घालत त्यांनी मानवी शरीराला शेतीची उपमा दिली. अगदी यथोचित व वेळेवर या परिषदेचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी सकाळ समुहाची प्रशंसा केली. देशात 127 हवामान क्षेत्र असून त्यापैकी नऊ महाराष्ट्रात असल्याचे त्यांनी नमूद केले. मागील 75 वर्षात कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण 30टक्क्यांनी वाढले असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. प्रतापराव पवार यांनी सकाळ माध्यमाने तीन लाख वीस हजार शेतकऱ्यांपर्यंत शेती संदर्भातील माहिती चे मार्गदर्शन केल्याचे सांगितले. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतक-याच्या जमिनीसाठी योग्य असणारे पीक व त्यानुसार आवश्यक सर्व गोष्टींची माहिती ॲपद्वारे देण्यात येईल, अशा ॲपवर काम चालू असल्याचे त्यांनी सांगितले. आदिनाथ चव्हाण यांनी हवामान बदलाच्या प्रयत्नांमध्ये नुसती जागृती उपयोगी नाही तर कृती सुद्धा अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.
या परिषदेमध्ये हवामान बदल वर्तमान आणि भवितव्य, शेती आणि पशुवरील परिणाम आणि हवामान अनुकूल शेतीचे प्रारूप या विषयांवरील गट चर्चेत जलतज्ञ प्रदीप पुरंदरे, वैजनाथ घोंगडे, यशदाचे डॉ. सुमंत पांडे, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणेचे प्रमुख डॉ. कृष्णानंद होसाळीकर, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, कृषि महाविद्यालय, पुणेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, नागपूर माफसू विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने, महाधनचे नरेश देशमुख आणि बारामती कृषि विज्ञान केंद्राचे तुषार जाधव यांनी सहभाग घेतला. या गटचर्चेचे संवादक म्हणून ॲग्रोवनचे मुख्य उपसंपादक अमित गद्रे आणि कृषि महाविद्यालय, पुणेचे जल व्यवस्थापन तज्ञ डॉ. रविंद्र बनसोड यांनी काम पहिले. या प्रसंगी प्रतीकात्मक नदी जलपूजन करण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे माजी सदस्य पाशा पटेल, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे माजी कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर, ज्येष्ठ हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे उपस्थित होते. डॉ. धीरज कणखरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.