Ahmednagar Crime ः संगमनेर तालुक्यातील साकुर येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर तिने विषारी द्रव्य पिऊन जीव दिला. तिच्यावर अत्याचार करणारे आणि त्याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या नराधमांना आणि त्यांना मदत करणाऱ्यांचा स्थानिक महिलांनी कॅंडल मार्च काढून निषेध करण्यात आला.
साकुर येथील अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार झाला. ती दहावीचे प्रवेशपत्र घेण्यासाठी शाळेत गेली होती. त्यावेळी तिला एका पानटपरीत नेऊन तिच्यावर अत्याचार झाला. याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परंतु बदनामीच्या भीतीने तिने विषारी द्रव्य घेऊन आपले जीवन संपवले. आरोपीने यापूर्वी देखील असेच कृत्य केले आहे. हा त्यांचा पहिला गुन्हा नाही. संघटीत पद्धतीने ही गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. अल्पवयीन मुलींना फसवत आहेत.
या संघटीत गुन्हेगारांना काहींचा आश्रय आहे. यातून त्यांच्या गुन्ह्यांवर नजरेआड करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा घटना प्रत्येक गावात घडत आहेत. मुलींचे पालक या अशा प्रकरणांनी धास्तावले असून अशा या समाजकंटकांपासून आपल्या माताभगिनींचे रक्षण कसे होणार? असा प्रश्न महिलांनी कॅंडण मार्च काढून केला.
साकुरच्या निर्भयाला आयुष्य संपवायला लावणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. हा खटला जलदगती न्यायालयात चालवून लवकरात लवकर न्याय मिळावा! पीडितेच्या कुटुंबाचे समुपदेशन होऊन दबाव आणणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी. आरोपींना जामीन मिळू नये, अशी मागणी महिलांनी केली आहे.
सरपंच बाळासाहेब ढोले, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय कान्होरे, पोलिस पाटील बाळासाहेब कदम, अनिरुद्ध कान्होरे, बाळासाहेब गाडेकर, दत्तात्रय थोरात, शांताराम पाटकर, चंद्रकांत कहाणे, पुजा सोनवणे, सुनिता थोरात, मनिषा कान्होरे, कविता कहाणे, अलका ढमढेरे, सुभद्रा भोर, शांताबाई थोरात, कांता थोरात, हमीदा पठाण, निलम कहाणे, बेबी कवडे, लहाणबाई थोरात यांनी कॅंडल मार्च काढून पीडितेला श्रद्धांजली वाहिली.