Ahmednagar Political ः कोणतीही खोटी जुमलेबाजी नको, खोट्या एमआयडीसी नको, खोटे आयटी पार्क नको, खोटी आश्वासन नको. शहरात चांगले शिक्षण, आरोग्य, रस्ते, गटारी, रोजगार, वीज सुविधा मिळाल्या पाहिजेत. देशाचे संविधान सध्या धोक्यात आले आहे. हुकूमशाहीला पराभूत करण्यासाठी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते घरोघरी जावून संविधान वाचविण्यासाठी इंडिया आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचा प्रचार करणार असल्याचे प्रतिपादन आपचे शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ यांनी केले.
इंडिया आघाडीतील घटक पक्ष असणारा आम आदमी पार्टी पक्ष देखील आता नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार लंके यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरला आहे. लंके यांच्या प्रचाराच्या नियोजनाची आप पक्षाची बैठक पक्षाच्या सावेडीतील कार्यालयात पार पडली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची प्रमुख उपस्थित होते.
खाकाळ म्हणाले, नगर हे खड्ड्यांचे शहर झाले आहे. टॅक्स भरून देखिल मुलभूत सुविधा मिळत नाही. लोकप्रतिनिधी म्हणून विद्यमान खासदारांनी शहराला सापत्न वागणूक दिली आहे. त्यामुळे मतदारांमध्येच परिवर्तनाची भावना निर्माण झाली असून, निलेश लंके यांचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.
राणी लंके यांनी सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेला लोकप्रतिनिधीच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवू शकणार आहे. आम्ही साधी माणसं आहोत. मात्र सर्वसामान्यांचे दुःख दूर करणे, विकासाची दृष्टी ठेवून काम करणे, गरजवंताच्या हाकेला धावून जाणं यामुळेच पारनेरकरांसह महाराष्ट्रातील जनतेने अल्पावधीत लंके यांना भरभरून प्रेम दिले. लंके यांचे खासदार होणं म्हणजे सर्वसामान्य जनता खासदार होणं, असं असल्याचे त्यांनी सांगितले.
ॲड. महेश शिंदे यांनी ही लढाई धन शक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. निलेश लंके मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे. सर्वसामान्य जनतेला बदल आवश्यक असून, हुकुमशाही उलथवून टाकण्यासाठीचा व लोकशाही वाचविण्यासाठी ही निवडणुक आहे. येणाऱ्या पुढील काळात आप विधानसभा, महानगरपालिका आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवणुका लढून ते जिंकणार असल्याची भावना व्यक्त केली.
किरण काळे यांनी निवडणुका तोंडावर असताना घाबरलेल्या हुकुमशाही भाजपने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना खोट्या गुन्ह्यातून अटकेची कारवाई केली. सर्वसामान्य जनतेपुढे सत्तेचा दुरोपयोग होताना पाहत आहे. हुकुमशाहीला शह देण्यासाठी इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष लंके यांच्या प्रचारा करिता सक्रिय झाले आहेत. आगामी काळात महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतील घटक पक्षांना बरोबर घेऊन विरोधकांचा राजकीय आखाड्यात सुपडा साफ करण्याचे काम केले जाईल. नागरिकांना त्यांच्या मनातील काम करणारे सरकार अस्तित्वात आणण्यासाठी इंडिया आघाडीतील घटक पक्षांचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ओबीसी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, माथाडी कामगार काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, आपचे जिल्हा प्रवक्ता ॲड. महेश शिंदे, आपच्या महिला अध्यक्ष ॲड. विद्या शिंदे, उपाध्यक्ष संगीता खिलारी, उपाध्यक्ष गणेश मारवाडे, सिताराम खाकाळ, नितीन लोखंडे, देवदत्त साळवी, आपच्या कला संस्कृती आघाडीचे अध्यक्ष प्रकाश वडवणीकर, व्यापारी आघाडी अध्यक्ष राजेंद्र सामल, युवा आघाडी अध्यक्ष अनिल साळवे, रिक्षा आघाडी उपाध्यक्ष विजय लोंढे, महासचिव दिलीप घुले, सचिव सचिन एकाडे, साक्षीताई जाधव, सदस्य अंबादास जाधव, काँग्रेसचे शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, काँग्रेस माहिती व तंत्रज्ञान विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुजित क्षेत्रे, क्रीडा युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आकाश आल्हाट, अजय मिसाळ, किशोर कोतकर, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गौरव घोरपडे, सरचिटणीस आनंद जवंजाळ आदीं उपस्थित होते. विद्या शिंदे यांनी आभार मानले.