Nagar Forest Department Rescue : राहुरी खुर्द येथील शिंगणापूर फाटा येथे वर्दळीच्या ठिकाणी बिबट्या आढळून आला. वन विभागातील कर्मचारी आणि राहुरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने तब्बच चार तासानंतर बिबट्याला पकडण्यात यश आले. मात्र या दरम्यान बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वन विभागातील तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले.
काही दिवसांपासून राहुरी तालुक्यातील राहुरी खुर्द परिसरात बिबट्याचा वावर दिसून येत होता. बिबट्याने काही भटक्या कुत्र्यांचा फडशा पाडला होता. बिबट्या शनिवारी (ता. २३) रस्ता पार करत असताना त्याला एका वाहनाची धडक बसून तो जखमी झाला. रात्रीपासून तो बिबट्या शिंगणापूर फाटा येथील विद्यापीठ क्षेत्रात झाडाझुडपात दबा धरुन बसला होता. काही लोकांना दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. २४) दुपारी बिबट्या पुन्हा दिसला. याबाबत स्थानिकांनी प्रशासनाला माहिती दिली. उप वनसंरक्षक सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीचे सहायक वनसरंक्षक गणेश मिसाळ, वनक्षेत्रपाल युवराज पाचरणे, संगमनेरचे पथक संतोष पारदे, वन विभागाचे सतीश जाधव, समाधान चव्हाण, ताराचंद गायकवाड, शंकर खेमनर, राधाकिसन घोडसरे, कैलास रोकडे, लक्ष्मीकांत शेंडगे, वन कर्मचारी गोरख मोरे, पोपट ढोकणे, वनपाल सचिन शहाणे, सुनील अमोलिक, राहुरी पोलीस ठाण्यातील हवालदार प्रवीण बागुल, नदीम शेख, सचिन ताजने, प्रमोद ढाकणे, सतीश कुऱ्हाडे यांनी वन विभाग व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
बिबट्याला पकडण्यासाठी जाळे लावले. यानंतर त्याला भूलीचे इंजेक्शन देण्यात आले. या दरम्यान जखमी झालेल्या बिबट्याने प्रचंड अशा डरकाळ्या फोडत कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात वन विभागाचे संतोष परदेशी, ताराचंद गायकवाड, वैभव जाधव हे तीन कर्मचारी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यानंतर काही वेळाने बिबट्या बेशुद्ध झाला. त्यानंतर वन विभाग कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी परिसरातील तरुणांच्या मदतीने बिबट्याला जाळे टाकून पकडले आणि सायंकाळी सहा वाजे दरम्यान बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले. बिबट्याला पकडण्याचा हा थरार सुमारे तीन ते चार तास सुरु होता. या दरम्यान बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील शेकडो नागरिक घटनास्थळी गर्दी केली होती.