देशासह महाराष्ट्रात मंगलमूर्ती गणेश बाप्पाचे आगमन झाले. अहमदनगरमध्ये देखील विविध उपक्रमांनी गणेश बाप्पाचे स्वागत झाले. नगर तालुक्यातील आदर्श हिवरे बाजार गावात यंदाचा गणेश बाप्पा वेगळ्यापद्धतीने नियाेजन हाेत आहे. यंदाच्या गणेश उत्सवाची जबाबदारी गावातील महिलांकडे असणार आहे. विशेष म्हणजे, सार्वजनिक गणेश मंडळाची सुरूवात करणारे लाेकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पत्नी सत्यभामा ऊर्फ तापसीबाई टिळक यांना गावातील उत्सव अर्पण करण्याचा निर्णय ग्रामसभेत ठरावाद्वारे घेण्यात आला. या ठरावाचे काैतुक हाेत आहे.
आदर्शगाव हिवरेबाजार (ता. नगर) येथील गावातील मंडळाची जबाबदारी महिलांकडे साेपवण्याचा निर्णय ग्रामसभेच्या ठरावाद्वारे घेण्यात आला आहे. गावात गेल्या 28 वर्षांपासून ‘एक गाव-एक गणपती’, उपक्रम राबवला जाताे. यंदाचा गणेशाेत्सव गावातील सर्व घटकातील महिला मंडळ आयाेजित करणार असल्याची माहिती सरपंच विमल ठाणगे यांनी दिली. हा उपक्रम आदर्शगाव याेजनेचे राज्य कार्याध्यक्ष पाेपटराव पवार यांच्या पुढाकारातून हाेत असल्याचेही सरपंच ठाणगे यांनी सांगितले.
ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा संस्था, ग्रामविकास मंडळ, महिला बचत गट, मुंबादेवी सहकारी दूध उत्पादक संस्थेतील महिला सभासद उत्सव आयाेजित करण्यासाठी पुढाकार घेणार आहेत. आरतीही महिलाच करणार आहेत. वेगवेगळे उपक्रमही महिलाच राबवणार आहेत. त्यासाठी ग्रामविकास तरुण मंडळ सहकार्य करणार आहेत. जिल्ह्यात वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना तसेच ग्रामस्तरीय महिला सरकारी कर्मचार्यांना आरतीसाठी गावातील उत्सवात निमंत्रित केले जाणार आहे. उत्सव कालावधीत विविध सांस्कृतिक आणि स्पर्धांचे आयाेजन करण्यात आले आहे. प्राेत्साहनपर बक्षीस देखील दिली जाणार आहे.