Nagar News : युवक शेतकऱ्यावर ज्वलनशील द्रव्य टाकून पेटवण्याचा प्रकार पिंपळगाव वाघा (ता. नगर) येथे घडला आहे. या प्रकारात शेतकरी दादाभाऊ गोरख वाबळे (वय ३२) हा ८० टक्के भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी वाबळे यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. यात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
गाव नकाशात दर्शविलेल्या रस्त्याएेवजी दुसऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायतमार्फत रस्त्याचे काम सुरू झाल्याच्या वादातून हा प्रकार झाला. यातील जखमी शेतकरी वाबळे हे विरोध करत होता. हा विरोध दोन वर्षांपासून होता. बुधवारी (ता. ६) दुपारी साडेबारा वाजता शेतकरी, ग्रामपंचायत पदाधिकारी व काही ग्रामस्थ त्या ठिकाणी गेले. त्यांनी रस्त्याचे काम सुरू केले. त्याचवेळी दादाभाऊ वाबळे हे तिथे आले. त्यांनी कामाला विरोध केला. यातून वाद उफळला. यातून वाबळे यांच्या अंगावर कोणीतरी ज्वलनशील द्रव्य फेकत त्यांना पेटवून दिले. आगीचा भडका होऊन यात वाबळे हे गंभीर जखमी झाले.
दादाभाऊ वाबळे यांच्या नातेवाईकांनी धाव घेत आग विझवली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. वाबळे यांना सुरूवातीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथे ८० भाजल्याचे निदान झाले. यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नगर तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी पिंपळगाव वाघा येथे धाव घेतली. अतिरीक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रल्हाद गीते हे पोलीस कर्मचार्यांच्या फौजफाट्यासह दाखल झाले.
दरम्यान, वाबळे यांचा प्राथमिक जबाब पोलिसांनी घेतला आहे. त्यानुसार गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. एक आरोपी असला, तरी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांचे जबाब घेण्यात येणार आहे. तसेच याप्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी, सदस्यांची चौकशी होत आहे.