Fraud of businessman in Ahmednagar ः जुनी वास्तू पाडून त्या ठिकाणी नवीन वास्तू बांधण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाशी केलेल्या विकसन करारापोटी घेतलेली 98 लाख 99 हजार 811 रूपये रक्कमेचा अपहार केला. तसेच सदरची मिळकत दुसर्या दोन व्यक्तींना विकून व्यावसायिकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आठ जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
बांधकाम व्यावसायिक अनिल बबनराव जाधव (वय 49 रा. बोल्हेगाव फाटा, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. गिरीष प्रकाश लोखंडे, कांता प्रकाश लोखंडे, ज्ञानेश्वर मनोहर लोखंडे (तिघे रा. सिव्हिल हाडको, सावेडी, नगर), चंद्रकांत मनोहर लोखंडे, शोभा चंद्रकांत लोखंडे (दोघे रा. हवेली, जि. पुणे), पद्मा ज्ञानेश्वर लोखंडे (रा. सिव्हिल हाडको, सावेडी, नगर), संतोष संभाजी नाळे (रा. नाळे वस्ती, पुणे), उदयसिंग माणिकसिंग ठाकुर (रा. शुक्रवार पेठ, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
प्रकाश लोखंडे, ज्ञानेश्वर लोखंडे, चंद्रकांत लोखंडे यांच्या मालकीची नगर महापालिका हद्दीत तेलीखुंट भागात सिटी सर्व्हे नंबर 958, 959 या जागेत जुनी वास्तू पाडून त्या ठिकाणी नवीन वास्तुचे बांधकाम करायचे आहे, असे फिर्यादी जाधव यांना सांगितले गेले होते. याबाबत लोखंडे यांनी फिर्यादी जाधव यांच्यासोबत विकसन करार करून त्यापोटी वेळोवेळी एकुण 98 लाख 99 हजार 811 रूपये रोख व चेकने घेतले होते.
दरम्यान संशयित आरोपी यांनी सदर रक्कमेचा अपहार करून फिर्यादी जाधव यांना वकिलांमार्फत खोटी नोटीस पाठवून फसवणूक केली. दरम्यान लोखंडे यांनी सदरची मिळकत संतोष संभाजी नाळे व उदयसिंग माणिकसिंग ठाकुर यांना खरेदी खत करून विकली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आपली फसवणूक झाल्याचे जाधव यांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. अर्ज चौकशीनंतर सोमवार, 29 एप्रिल रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे अधिक तपास करत आहेत.