अहमदनगर शहरातील आंतरराष्ट्रीय किर्तीचे सायकलपटू जस्मितसिंह वधवा यांनी जगातील सर्वात जुनी सायकलिंग इव्हेंट असलेल्या पॅरिसच्या सायकल राईडमध्ये सहभाग नोंदवून पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस दरम्यानचा 1200 किलाेमीटरचा प्रवास 87 तासात पूर्ण केले. या राईडमध्ये सहभागी होणारे वधवा अहमदनगर जिल्ह्यातील पहिलेच सायकलपटू होते. त्यांनी नुकतीच काश्मीर ते कन्याकुमारी सायकल राईड 189 तासात पूर्ण केली होती.
डेक्कन रँडोन्यूरसच्या बॅनरखाली वधवा यांनी पॅरिसच्या सायकल राईडमध्ये सहभाग घेतला होता. 1891 पासून दर चार वर्षांनी पॅरिसमध्ये ही सायकल राईड आयोजित केली जाते. ही 27 वी राईड होती. पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस ही पॅरिसपासून ब्रिटनीमधील ब्रेस्ट आणि पुन्हा परत जाण्यासाठी 1200 किलाेमीटरची अटलांटिक किनाऱ्यावरील राइडचा रुट होता. मोठा इतिहास, प्रतिष्ठा आणि आव्हानात्मक असलेली राईड जगभरातील सायकलपटूंसाठी स्वत:ला सिध्द करण्याची पर्वणी होती. जगातील 6 हजारहून अधिक सायकलपटू यामध्ये सहभागी झाले होते.
शारीरिक क्षमेतेचा कस लावणाऱ्या व अत्यंत अवघड ट्रॅक असलेली ही राईड 90 तासात पूर्ण करायची होती. वधवा यांनी 87 तास 45 मिनिटात ही राईड पूर्ण करुन तिरंगा ध्वज फडकाविला. यापूर्वी त्यांनी गेट वे ऑफ इंडिया (मुंबई) ते इंडिया गेट (दिल्ली), काश्मीर ते कन्याकुमारी या राईड केल्या आहेत. जस्मितसिंह वधवा ज्येष्ठ लेखक देवेंद्रसिंह वधवा यांचे चिरंजीव तर सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा व सनी वधवा यांचे बंधू आहेत. वधवा यांनी ही राईड पूर्ण केल्याबद्दल त्यांचे काैतुक होत आहे.