Ahmednagar Police ः धान्य विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणी मागितल्याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसात तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहरुख रज्जाक शेख (रा.मिल्लतनगर, श्रीरामपूर), तौफिक राजू पठाण (रा.बेलापूर) व रेहान पठाण (रा.कोल्हार) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. भरत मोहन आछडा उर्फ बंटी (रा.मोरगे वस्ती, लक्ष्मी आई रोड, श्रीरामपूर) यांनी फिर्याद दिली आहे.
भरत आछडा यांनी सोनवणे याच्याकडून मोटारगाडी घरगुती वापराकरीता विकत घेतली होती. ती गाड़ी तीन महिन्यांपूर्वी शाहरुख शेख याला विकली. परंतु, त्याने आजपर्यंत एक रुपयाही दिला नाही. सदर गाडीच्या पैशाच्या मागणीसाठी त्याला कॉल केला होता. त्यानंतर रविवारी (ता.21) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मोरगेवस्ती येथील मोकळ्या मैदानातून पत्नी अक्षदासह दुचाकीवरून घरी येत असताना शाहरुखचा कॉल आला. तो म्हणाला, की सदर गाडीचे पैसे मागू नको. तसेच त्याने मला कुठे आहे, असे विचारले असता मी गणपती मंदिर, मोरगे वस्ती येथे पत्नीसोबत असल्याचे सांगितले. मी घरी निघत असतांना तो पाठीमागून काळ्या रंगाच्या गाडीने आला. त्याने गाडी आडवी लावून गाडीत बसायाला लावले. गाडीत बसण्यास नकार दिला, असता वरील तिघांनीही बळजबरीने गाडीत बसविले. नॉर्दन ब्रॅंचवरुन संगमनेर रस्त्याने, अस्तगाव रस्त्याने व परत वाकडी मार्गे एका शेतात घेऊन गेले.
यानंतर शाहरुख याने पायावर लोखंडी राॅडने, तर तौफिक व रेहान यांनी पाठीवर, छातीवर लाथाबुक्क्यानी मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच तुला व तुझ्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत तुला सुखरूप घरी सोडतो, त्या बदल्यात पाच लाख रुपये दे, नाहीतर येथेच मारून टाकतो, अशी धमकी दिली. मी त्यांना उद्या पैसे देईन असे भितीपोटी सांगितले. त्यामुळे त्यांनी पुणतांबा-खैरीमार्गे श्रीरामपूर येथे रामराव आदिक पुतळ्याजवळ आणून सोडले.
या घटनेबाबत वाच्यता केली अथवा पोलिसांत तक्रार केल्यास जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. यानंतर सोमवारी (ता.22) दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास माझ्या घरात पत्नी व मुलगा घरात असतांना शाहरुख शेख, तौफिक पठाण हे बळजबरीने घरात शिरले. पत्नीला वाईट बोलून कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूद्ध अपहरण करून खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.