Ahmednagar News ः अहमदनगर शहरातील कोठला परिसरात असलेल्या ईदगाह मैदानाच्या संरक्षण भिंतीलगत असलेल्या महापालिकेच्या विद्युत खांबावर पॅलेस्टाईनचा झेंडा विनापरवाना लावल्याचा प्रकार बुधवारी दुपारी घडला. कोतवाली पोलिसांच्या लक्षात ही बाब येताच झेंडा उतरवला. याप्रकरणी महापालिकेचे कर्मचारी मुजमील राजू पठाण यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे.
याबाबत माहिती अशी ः रमजान ईदमुळे कोठला इथल्या ईदगाह मैदानाची साफसफाई करण्यात आली होती. याच मैदानालगत असलेल्या एका विद्युत खांबाचा आधार घेत पॅलेस्टाईनचा झेंडा लावण्यात आला होता. हा झेंडा कधी आणि केव्हा लावला याचा माहिती नाही. परंतु कोतवाली पोलिसांना याची भनक लागली. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पोलीस कर्मचारी आणि गोपनीय विभागातील कर्मचाऱ्यांना मैदानाकडे रवाना केले. पोलिसांनी हा झेंडा तत्काळ खाली उतरवून घेतला. हा झेंडा खूप मोठा होता. कोतवाली पोलिसांनी हा झेंडा तत्काळ ताब्यात घेत वरिष्ठांना याची माहिती दिली.
पोलीस अधीक्षक राकेश ओला आणि शहर पोलीस उपअधीक्षक अनिल भारती यांनी याप्रकाराची गंभीर दखल घेतली. पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी याप्रकरणी महापालिका प्रशासनाला कळवून फिर्यादी देण्याची सूचना केली. महापालिकेचे प्रशासक आयुक्त डाॅ. पंकज जावळे यांनी पोलीस प्रशासनाच्या सूचनेप्रमाणे महापालिकेच्या विद्युत विभागातील कर्मचारी मुजमील पठाण यांना फिर्याद देण्यासाठी नियुक्त केले. कोतवाली पोलिसांनी फिर्यादीनुसार गुन्ह्याची नोंद घेतली. अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. विद्युत खांबावर पॅलेस्टाईन देशाचा झेंडा विनापरवाना लावून सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, पॅलेस्टाईनचा झेंडा अहमदनगर शहरात लावण्याचे कारण काय? रमजान ईदच्या अदल्यादिवशी ईदगाह मैदानालगतच हा झेंडा का लावला? हा झेंडा कोणी आणला किंवा अहमदनगरमध्येच तयार केला गेला का? अशा अनेक प्रश्नांची चर्चा अहमदनगर शहरात सुरू आहे. हा झेंडा लावण्यामागे देशविघातक प्रवृत्तींचा हात तर नाही ना?, अशी देखील चर्चा आहे. रमजान ईदची नमाज आणि वरील सर्व पार्श्वभूमीवर अहमदनगर शहर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.