Bank Credit Card Counterfeit ः बॅंकेचे बनावट क्रेडिट कार्ड तयार करून फसवणूक करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. राहुरीतील किरण चिंधे यांनी दिलेल्या तक्रारीची उकल करताना पोलिसांना या तिघांना अटक करण्यात यश आले आहे. नवाब हबीब सय्यद ऊर्फ सोनू (वय ३०, रा. महादेव वाडी, ता.राहुरी), असलम चांद पठाण ऊर्फ भैय्या (रा. राहुरी), कारभारी देवराम गुंड (वय २८, रा. महादेव मंदिरा शेजारी, कुक्कडवेढे, राहुरी, हल्ला रा. गावटेनगर, घुलेनगर, मांजरी बुद्रुक, पुणे) या तिघांना अटक केली आहे.
या तिघा गुन्हेगारांनी तक्रारदार किरण चिंधे यांचे मोबाईल क्रमांक वापरून फिर्यादीचे पॅन कार्डवरील संपूर्ण नाव, पॅनकार्ड नंबर, जन्मतारीख, बनावट ई-मेल आयडी, राहण्याचा पत्ता, बनावट तयार करून इंडसंट बँकेचे क्रेडिट कार्ड प्राप्त केले. यानंतर ८३ हजार रुपयांचा अपहार केला. किरण चिंधे यांनी तक्रार दिल्यानंतर राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांनी गुन्ह्याची उकल करण्याची सूचना उपनिरीक्षक चारूदत्त खोंडे यांना केल्या. यानुसार राहुरी पोलिसांनी बनावट क्रेडिट कार्ड करून ग्राहकांच्या बॅंक खात्यात अफरातफर केल्याचे तपासात उघडकीस आले.
पोलिसांच्या चौकशीत या गुन्हेगारांनी कसे बनावट क्रेडिट कार्ड तयार केले याची माहिती दिली. एखाद्या व्यक्तीचे आधार किंवा पॅनकार्ड प्राप्त केल्यानंतर त्यावरील माहिती मोबाईलमधील एप्लीकेशनच्या माध्यमातून बदलण्यात आले. यानंतर बनावट बनविलेल्या आधारकार्डवरील पत्ता, मोबाईल नंबर, ई-मेल बनवून त्याद्वारे कोणत्याही बँकेचे क्रेडिट कार्ड प्राप्त करून घेतले. या क्रेडिट कार्डवापर करून पैसे काढून घ्यायचा उद्योग सुरू केला. यातून ज्याच्या नावावर क्रेडिट कार्ड काढलेले असायचे, त्याला या गोष्टीचा कुठलाही थांगपत्ता लागत नव्हता. परंतु तो जेव्हा बँकेत लोन काढण्यासाठी जातो त्यावेळी त्याला त्याचे सिबिल खराब झालेले आहे, असे समजते. अशाप्रकारे बराच लोकांची आधार आणि पॅनकार्ड वापरून त्यांच्या नावाने क्रेडिट कार्ड तयार करून परस्पर फायदा लाटल्याचे राहुरी पोलिसांसमोर या तिघा गुन्हेगारांनी सांगितले आहे.
उपनिरीक्षक चारूदत्त खोंडे, पोलीस कर्मचारी विकास साळवे, सुरज गायकवाड, राहुल यादव, प्रवीण बागुल, प्रमोद ढाकणे, नदीम शेख, शिरसाठ, सचिन ताजणे यांच्या पथकाने गुन्ह्याची उकल केली आहे.