Election Commission on Lok Sabha 2024 : लोकसभा २०२४ ची निवडणुकीची आचारसंहिता या महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत कधीही जाहीर होईल. ही आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने देशातील सर्व राजकीय पक्षांना कडक सूचना दिल्या आहेत. जात, धर्म, भाषा आणि इतर प्रलोभने देत अनेक मार्गांनी मते मागू नयेत. तसेच आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवार आणि स्टार प्रचारकांवर कारवाईच्या कडक सूचना आयोगाने दिल्या आहेत.
उमेदवार आणि स्टार प्रचारकांनी जातीय भावनांवर मतदारांना अपील करू नये. विविध जातीय गटांमध्ये मतभेद आणि शत्रुत्व वाढवणाऱ्या कृत्यांना बढावा देऊ नये. दिशाभूल, खोटी विधाने किंवा निराधार आरोपांचा प्रचार करू नये. वैयक्तिक हल्ले टाळावे. राजकीय भाषणात संहितेचे पालन करावे. निवडणूक आयोगाने दिलेल्या खर्चाची मर्यादा पाळावी. धर्माबरोबरच मंदिर, मशीद, चर्च, गुरूद्वारा किंवा इतर कोणत्याही धार्मिक स्थळांचा वापर करू नये. महिलांचा सन्मान राखावा. महिलांचा आपमान होणार नाही, अशी विधाने करणे टाळावी. असत्यापित आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसारमाध्यमांना देऊ नयेत. समाज माध्यमांवर संयम ठेवावा. प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध बदनामीकारक पोस्ट करणे टाळावे.
निवडणूक आयोगाने लागू केलेल्या आदर्श आचारसंहितेचा पालन करावे. तसेच कायदेशीर चौकटीत राहून प्रचार करावा. निवडणूक आयोगाने विविध राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना निवडूक प्रचारादरम्यान शिष्टाचार राखवा. स्टार प्रचारक आणि उमेदवार, विशेषत: ज्यांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, त्यांच्यावर कायदेशीर मार्गाने अतिरिक्त लक्ष देण्यात येणार आहे. राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी वस्तुस्थिती नसलेली विधाने करू नयेत किंवा मतदारांची दिशाभूल करू नये, असेस आयोगाने म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने आपल्या सूचनांमध्ये समाज माध्यमांवरील हालचालींचाही समावेश केला आहे. प्रतिस्पर्ध्यांची बदनामी करणाऱ्या किंवा त्यांचा अपमान करणाऱ्या आणि प्रतिष्ठेचा अपमान करणाऱ्या पोस्ट करू नयेत किंवा पोस्ट शेअर करू नये, अशी तंबी निवडणूक आयोगाने दिली आहे.