Sharad Pawar On Devendra Fadnavis : मनोज जरांगे यांच्या पाठिशी कोण यावरून आजचे विधिमंडळाचे अधिवेशन चांगलेच गाजले. भाजप आमदार आशिष शेलार यांचा रोख राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार राजेश टोपे यांच्याकडे होता. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शरद पवार यांच्यावर हल्ला चढवला. शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. या सर्वांचा समाचार शरद पवार यांनी घेतला आहे. महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांपासून ते आजच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक मुख्यमंत्र्यांचे वर्तन पाहिले आहे. परंतु आताचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री खोटे बोलणारे पाहिले नाहीत, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
शरद पवार यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. यात शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्तनावर भाष्य केले. शरद पवार म्हणाले, “जबाबदार असलेल्या लोकांनी अशी वक्तव्य करणे योग्य नाही. तशी त्यांनी ती करू नये. जबाबदारीने बोलायला शिकले पाहिजे. त्या दोघांची वक्तव्ये पोरकटपणांची आहेत. जबाबदार व्यक्ती इतके खोटे बोलते आहे. मी यापूर्वी एवढा खोटारडेपणा पाहिला नव्हता. मी महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक मुख्यमंत्री यांचे वर्तन पाहिले आहे. परंतु आताच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे अशा प्रकाराचे वर्तन मी कधीच पाहिले नव्हते”.
मनोज जरांगे यांचे अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू असताना त्यांना एकदाच भेटलो होतो. मी सर्वात अगोदर त्यांना भेटायला गेलो होतो. हे आंदोलन करताना सामाजिक शांतता जपा. दोन समाजामध्ये अंतर वाढणार नाही, याची काळजी घ्या. महाराष्ट्रातील सामाजिक एेक्य टिकवा, एवढाच आमच्यात संवाद झाला होता. आजअखेर आमच्या भेट नाही की, संवाद नाही. असे असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी असा माझ्यावर आरोप करणे चुकीचे आहे. प्रामुख्याने उपमुख्यमंत्र्यांनी असे बोलायला नको होते, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे यांच्या मागे असलेल्या आंदोलनाला कोणाचा आर्थिक पुरवठा आहे, याची चौकशीसाठी राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली आहे. त्यावरही शरद पवार यांनी भाष्य केले आहे. कर नाही, त्याला डर कसला. या एसआयटीमध्ये निवृत्ती न्यायाधीशाची नियुक्ती करा, अशीही मागणी शरद पवार यांनी केली. मनोज जरांगे यांचे फोन तपासा. त्यांच्या सहकारींचे फोन तपासा. सत्ताधारी, आमचे फोन तपासा. जरांगेंना एक तरी फोन झाला असेल, आणि ते सिद्ध झाल्यास, तर तुम्हाला वाट्टेल ती गोष्ट मी मान्य करेल, असे आव्हान शरद पवार यांनी दिले.