Tirupati Balaji Temple Festival ः ढोल पथकाचे वादन, उंटस्वार, घोडेस्वार, लेझीमचे डाव, टाळकरी, वारकरी संप्रदायाचा हरिनामाचा गजर, पुष्पवृष्टी आणि जोडीला व्यंकटरमणा गोविंदाचा गजर अशा शाही थाटात नगरमध्ये तिरुपती आंध्रप्रदेश येथील तिरुमला तिरुपती बालाजी देवस्थानच्या मुख्य गाभाऱ्यातील श्री तिरुपती बालाजी, पद्मावती देवी व महालक्ष्मी देवीच्या मुख्य उत्सव मूतींची शोभायात्रा काढण्यात आली. बडीसाजन मंगल कार्यालयापासून सुरु झालेल्या या शोभायात्रेत नगरमधील बालाजीभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अवघे वातावरण बालाजी भक्तीने भारुन गेल्याचे पहायला मिळाले. शोभायात्रा पाहण्यासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. तिरुमला तिरुपती देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा यांच्या हस्ते बालाजी, महालक्ष्मी व पद्मावती देवीची आरती करण्यात आली.
कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या तिरूपती बालाजी देवस्थानच्या श्री बालाजींचा श्रीनिवास कल्याणोत्सव (विवाह) सोहळा नगर पुणे रस्त्यावरील शिल्पागार्डन येथे आयोजित करण्यात आला होता. तत्पूर्वी सायंकाळी ५ च्या सुमारास बडीसाजन मंगल कार्यालयापासून उत्सवमूर्तींची भव्यदिव्य अशी शाही थाटात शोभायात्रा काढण्यात आली. तिरुपती देवस्थानच्या वाहनात उत्सवमूर्ती विराजमान होत्या. शोभायात्रा मार्गावर अतिशय सुंदर रांगोळी काढण्यात आली होती. रूद्रनाद ढोल पथकाच्या बहारदार वादनाने वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. महावीरनगर लेझीम ग्रुपच्या युवती, महिलांनी लेझीमचे पारंपरिक डाव सादर केले.
दक्षिण भारताची संगीत ओळख असलेल्या नादस्वरम, तवीला वाद्यांनी तिरूपतीला आल्याची अनुभूती भाविकांना मिळाली. तिरूपती देवस्थानच्या धर्तीवर श्रीवारी सेवा करणाऱ्या स्वयंसेवकांनीही शोभायात्रेत सहभाग नोंदवला. या जोडीलाच महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाची ओळख असलेले टाळकरी हरिनामाचा गजर करीत सहभागी झाले होते. शोभायात्रेवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. साईदास परिवार ट्रस्टचा फुलांनी सजवलेला रथही शोभायात्रेत होता. जागोजागी भक्तांनी उत्सवमूर्तीचे दर्शन घेत गोविंदा, गोविंदा असा गजर केला. जैन ओसवाल युवा संघ, जय आनंद फौंडेशनसह विविध युवा संघटनांचे सदस्य शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
तिरूपती देवस्थानच्या पुजाऱ्यांनी पारंपरिक पध्दतीने शोभायात्रेचे संचालन केले. शोभायात्रेत कार्यक्रमाचे आयोजक तिरूपती बालाजी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सौरभ बोरा यांच्यासह नियोजन समितीचे सी.ए.रवींद्र कटारिया, सुधीर मुनोत, संजय तातेड, अनिल लुंकड, किरण राका, अनिल पोखरणा, अजित बोथरा, अनिल शर्मा, नरेंद्र बाफना, आशिष खंडेलवाल, पियुष मुथा, अभिजीत कोठारी, महेश गुगळे, अमित मुथा, धनेश कोठारी आदी सहभागी झाले होते. उत्सवमूर्तींची शोभायात्रा नगरकरांसाठी मोठी धार्मिक पर्वणी ठरली.