Education News ः नगर जिल्ह्यातील तुळापूर (ता.राहुरी) या शाळेतील दोन विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे.’राज्य सरकार, राज्य मराठी विकास संस्था आणि पुण्यातील मॅप एपिक कम्युनिकेशनतर्फे ‘राज्यस्तरीय लोकमान्य टिळक अंकनाद पाढे सात्मीकरण स्पर्धा पर्व-५’ या गणितीय स्पर्धेत तुळापूर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेतील आदित्य सांगळे, अदिती वाकचौरे, वैदेही खामकर, समृद्धी हारदे, अंश वाकचौरे, अपेक्षा हारदे, विराज खामकर या सात विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विजेते म्हणून राज्यस्तरीय फेरीसाठी निवड करण्यात आली. यशस्वी विद्यार्थ्यांचा शिक्षकांसोबतचा सेल्फी सोशल मीडियावर प्रसिद्ध करून गुणवंणतांचे कौतुक करणे व इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे हा हेतू असणाऱ्या सेल्फी विथ सक्सेस उपक्रमाचा वापर शिक्षकांनी करण्याचे ठरविले. या उपक्रमाचा फायदा, असा झाला की विद्यार्थी अजून चिकाटीने प्रयत्न करू लागले, यश मिळविण्यासाठीची त्यांची धडपड वाढली. पुढे होणाऱ्या राज्यस्तरीय फेरीसाठी विद्यार्थी अधिकव जोमाने प्रयत्न करू लागले.
राज्यस्तरीय फेरीमध्ये पाढ्यांवर आधारीत शाब्दिक गणिते विद्यार्थ्यांनी विचारण्यात आली होती. ज्यामध्ये इयत्ता दुसरी-तिसरीच्या गटामधून अंश बाबासाहेब वाकचौरे या विद्यार्थ्यांने महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत नियमित पाढ्यांसोबतचजुन्या पिढीला मुखोद्गत असणारे अपूर्णांकांचे पाढे ही स्पर्धेच्या वरच्या गटासाठी विचारण्यात आले होते. इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या विराज विवेकानंद खामकर या विद्यार्थ्यांने पुढील गटात म्हणजेच इयत्ता सहावी- सातवी च्या गटात सहभागी होऊन संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
या दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन गावचे सरपंच गणेश हारदे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतिष हारदे, पोलीस पाटील बाळकृष्ण हारदे त्याचप्रमाणे तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मोहिनीराज तुंबारे, शिक्षणविस्तार अधिकारी उषा सिनारे, केंद्रप्रमुख दत्तात्रय पटारे यांनी केले आहे. समस्त पालक, तुळापूर ग्रामस्थ व शिक्षण वर्तुळातून विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक विवेकानंद खामकर व मुख्याध्यापक जगन्नाथ भांगरे यांचे मार्गदर्शन लाभले.