Education Newsः डॉ. हेडगेवार विद्या प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेच्या गुणवत्ता यादीत सर्वाधिक विद्यार्थी येण्याचा बहुमान रयत शिक्षण संस्थेच्या कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाने पटकाविला आहे. शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून, या परीक्षेत रिओ रियाज शेख हा विद्यार्थी नगर जिल्ह्यात पहिला तर 12 विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
प्रज्ञाशोध परीक्षेत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेत सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. मुरलीधर पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, बाबासाहेब नाईकवाडी, माध्यमिकच्या मुख्याध्यापिका छाया काकडे, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके आदी उपस्थित होते.
ॲड. मुरलीधर पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांनी ध्येय समोर ठेऊन वाटचाल करावी. विविध स्पर्धा परीक्षेत उतरल्याने स्वत: मधील क्षमता ओळखता येते. तर शिक्षणाबरोबर एखादा छंद व खेळ खेळल्यास मन प्रसन्न राहून आरोग्य देखील उत्तम राहत असते. जीवनात यश प्राप्त करण्यासाठी नियोजन व परिश्रम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्ञानदेव पांडुळे म्हणाले की, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयात सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेऊन आपली गुणवत्ता सिध्द करत आहे. विद्यार्थ्याांनी मिळवलेले यश हे शाळेच्या गुणवत्ता सिध्द करते. सर्व शिक्षक वर्ग समर्पित भावनेने कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. नवनाथ बोडखे यांनी ही शाळा जिल्ह्यात केवळ गुणवत्तेच्या नावानेच ओळखली जाते. नवीन शैक्षणिक धोरणाची कार्यपद्धतीचे नियोजन व शाळा विकासाचा आराखडा समोर ठेवून भविष्यवेधी उपक्रमांची आखणी करून विद्यार्थी घडविण्याचे कौतुकास्पद उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविकात शिवाजी लंके यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली.
प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत हर्षवर्धन अतुल झावरे (बारावा), श्रेयस बाळासाहेब सायकड, ईशान हरी पालवे (तेरावे), विराज देवीकुमार कुमटकर, सई शेखर उंडे (पंधरावे), स्वराज संतोष रोहोकले (सोळावा), आदिराज धीरज कोतकर (अठरावा), अनविका प्रवीण शेळके (एकोणिसावी), अपेक्षा रावसाहेब नरसाळे (विसावी), अगन्या गणेश खराडे, यशश्री नवनाथ खराडे (एकविसाव्या) यांनी यश प्राप्त केले. तर 200 च्या वर गुण मिळवणारे 26 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.