Nagar News : नगर-पुणे महामार्गावरील केडगाव उपनगरातील अंबिकानगर भागात शनिवारी सकाळी बिबट्याचा थरार रहिवाशांनी अनुभवला. त्याने पंजा मारल्याने अरुण चौरे व दीपक धस हे दोघे किरकोळ जखमी झाले. त्याला पकडण्यासाठी जुन्नरहून विशेष पथक केडगावकडे येत असल्याचे सांगण्यात आले. त्याची प्रतीक्षा होती. मात्र, तोपर्यंत अंबिकानगर परिसरात बघ्यांची पळापळ व कलकलाट सुरू होता.
पुणे महामार्गावरील अंबिकानगर बसथांब्यापासून समोरच्या बाजूने शाहूनगरकडे जाणारा रस्ता आहे. त्याच रस्त्याच्या पलीकडे कुमटकर क्लासेसची इमारत आहे. तेथे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास कोणीतरी बिबट्याला पाहिले व हलकल्लोळ उडाला. त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करणार्या अरुण चौरे व दीपक धस या दोघांवर त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याने पंजा मारल्याने त्यांच्या हाताला व डोक्याला जखमा झाल्या आहेत. या दोघांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. या दोघांशिवाय आणखीही दोघेजण त्याच्या हल्ल्यात जखमी झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यांची नावे व माहिती मिळाली नाही. यावेळी झालेल्या पळापळीतही खाली पडून काहीजण जखमी झाल्याचे सांगण्यात येते.
केडगावात बिबट्या आल्याची माहिती गावात व नगरमध्येही समजल्यावर त्याला पाहायला बघ्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे त्याने कुमटकर क्लासेस इमारतीशेजारील एका घरात आश्रय घेतला. परिसरातील त्याचे अस्तित्व भीतीचे असल्याने बहुतांश रहिवाशांनी घरांना आतून कड्या-कुलुपे लावून आत थांबणेच श्रेयस्कर मानले. वन विभागाच्या कर्मचार्यांनी तो जेथे लपून बसला, त्या घराच्या बाहेर जाळ्या लावल्या होत्या व त्याला पकडण्यासाठी जुन्नरहून विशेष पथकाला पाचारण केले आहे.
दरम्यान, दोन बिबटे होते व त्यापैकी एक बिबट्या डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या बंगल्याच्या परिसरात आधी घुसला व तेथून मग पाठीमागील नाल्याच्या दिशेने गेल्याचे काहींनी सांगितले. त्यानंतर दुसरा बिबट्या त्याच परिसरातील एका घरात लपून बसल्याचे स्पष्ट झाल्यावर त्याला पाहण्यासाठी गर्दी झाली होती. त्याचे मोबाईलमध्ये फोटो व व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न अनेकजण करीत होते.