Nagar District Urdu Sahitya Parishad ः “गजल, गीत व मुशायर्याला दिवसेंदिवस रसिकवर्ग वाढत चालला आहे, त्याचे एकमेव कारण म्हणजे उर्दू भाषा. या भाषेच्या गोडव्यामुळे ही भाषा शिकण्याकडे लोकांचा कल दिवसेंदिवस वाढत चालला आहे”, असे प्रतिपादन रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूस तांबटकर यांनी केले.
मख़दुम सोसायटी व नगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्यावतीने माणिकचौक येथील एटीयु जदीद उर्दू प्राथमिक शाळेत मिर्जा गालीब यांच्या स्मृतीदिन हा उर्दू दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्त उर्दू सप्ताह चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर,अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे सचिव आबीद दुलेखान, लातूरचे साहित्यिक फहिम शेख, मुख्याध्यापक खान नासिर ख्वाजालाल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विधार्थांनी हम्द नाआत कविता व वक्तृत्वा मध्ये उर्दु भाषेचे गुणगान व महत्व सादर केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना राजगिरीचे लाडु वाटप करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बाल साहित्याची पुस्तके वाटप करण्यात आली.
युनुस तांबटकर म्हणाले, “शायरी (कविता)ची नजाकत व त्याच्या गोडव्यामुळे आज गजलला चांगले दिवस आले आहेत. टीव्ही, सिनेमामध्ये उर्दू भाषा येणे फार गरजेचे आहे. बर्याच कलावंतांनी सिनेमाममध्ये काम मिळाल्यावर उर्दू भाषा बोलता येणे किती गरजेचे आहे, हे बर्याच वेळी मुलाखतीतून स्पष्ट केले आहे. म्हणून शालेय शिक्षण जरी उर्दूत झाले नाही. तरी लोक खाजकी शिक्षकाकडून उर्दू भाषा शिकत आहे”. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. पण आज खेड्यापाड्यात प्राथमिक शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षणाची उर्दूत सोय नसल्यामुळे उर्दू भाषेत शिक्षण घेण्याकडे पालकांचा कल कमी होत चालला आहे. याकडे भविष्यात लक्ष केंद्रीत करणे गरजेचे झाले आहे; नाही तर भविष्यात उर्दू शाळांची संख्या फार कमी राहिलेली दिसेल, अशी खंत व्यक्त केली.
नगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे सचिव आबीद खान म्हणाले, “उर्दू भाषिक शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण देणे काळाची गरज असून, तसे न झाल्यास भविष्यात पालक उर्दू शाळेत मुलांना शिकविणार नाहीत. याचा संस्था चालकांनी भान ठेवणे गरजेचे आहे”. उर्दू भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा, या दृष्टीने या सप्ताहची निर्मिती केली आहे. यासाठी परिषदेच्यावतीने विविध उपक्रम राबविले जातात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक नासिर खान यांनी शाळेत उर्दु सप्ताहमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देऊन याचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होतो व शाळेला काय फायदा होतो हे सविस्तर सांगितले. नसरीन शेख, सैय्यद फरहाना, खान नफीसा, जुनेद शेख, अन्सार शेख, इरफाना खान, शेख अनीसा, इमरान खान, शेख दानिश, जिशान पटेल, सैफ शेख, तस्लिम पठाण, शेख शौकत यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. इमरान खान यांनी सूत्रसंचालन केले. जिशान पटेल यांनी आभार मानले.