अहमदनगर : अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या उपमुख्याध्यापिका सुषमा सिद्धेश्वर चिटमील या सेवानिवृत्त झाल्या. सेवापूर्ती कार्यक्रमात शाळेच्या वतीने त्यांचा गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला.
प्राचार्य उल्हास दुगड म्हणाले की, 31 वर्ष ज्ञानदानाचे कार्य उपमुख्याध्यापिका चिटमील यांनी अखंडपणे चालू ठेवले. इंग्रजी, संस्कृत या विषयावरती प्रभुत्व गाजवून शिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक व केंद्रप्रमुख अशी विविध पदे त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. आपल्या सेवेमध्ये त्यांनी कधीही तक्रारींचा सूर येऊ दिला नाही. त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे कार्य करुन अनेक विद्यार्थी घडविल्याचे त्यांनी सांगितले.
सेवापूर्ती कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे प्राचार्य उल्हास दुगड उपस्थित होते. याप्रसंगी पर्यवेक्षक रावसाहेब बाबर, पर्यवेक्षिका आशा सातपुते, हायस्कूलच्या सल्लागार समिती सदस्या सौ.एम. पी. कुलकर्णी, सेनापती बापट विद्यालयाचे प्राचार्य संजय पडोळे, विश्रामबाग हायस्कूलच्या मुख्याध्यापिका उज्वला कळमकर, किशोर संस्कृतच्या गोत्राळ मॅडम, भिंगार हायस्कूलचे प्रभारी मुख्याध्यापक रावसाहेब कासार आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. अध्यापक एस.ए. गुगळे, यु.आर. भंडारी व दिपाली चन्ना यांनी आपले मनोगत व्यक्त करुन चिटमील यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुषमा चिटमील व सिध्देश्वर चिटमील यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.
सुषमा चिटमील यांच्या शिक्षकी पेशाची सुरुवात रूपीबाई बोरा विद्यालयापासून सुरू झाली. त्यानंतर महेश मुनोत विद्यालय (वांबोरी), भिंगार हायस्कूल (भिंगार), सेनापती बापट विद्यालय (पारनेर), भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल मध्ये सेवा केली. 31 वर्ष ज्ञानदानाचे कार्य केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या. घरात बिडी बनविण्याचा व्यवसाय करत असलेल्या आई-वडिलांनी आपल्या मुलींना बिडी बनविण्याच्या व्यवसायापासून दूर ठेवले होते. आपल्या मुलींनी शिक्षण घेऊन शिक्षक पदावरती रुजू व्हावे अशी इच्छा बाळगून त्यांनी त्यांना विद्या विभूषित केले. शिक्षक बनण्यामध्ये फक्त आई वडीलांचीच नव्हे तर त्यांच्या पतीची ही त्यांना मोलाची साथ लाभली. वाचनाची आवड असणाऱ्या शांत, संयमी, प्रामाणिक, कर्तव्यदक्ष म्हणून नावरुपास आल्याचा त्यांचा कार्यक्रमात परिचय करुन देण्यात आला. प्रास्ताविक एस.ए. पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय.एस. कुलकर्णी व ए.एम. गोले यांनी केले. आभार ए.ए. पटवा यांनी मानले.